मनसे पदाधिकारी आक्रमक ; मक्तेदारास जाब विचारत धरले धारेवर
इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकात स्वच्छतागृह वापरासाठी महिलांकडून शुल्क आकारले जात असल्याने आज मनसे पदाधिकारी आक्रमक झाले.त्यांनी याबाबत संबंधित मक्तेदारास जाब विचारत चांगलेच धारेवर धरले.तसेच शुल्क आकाराचा फलक फाडून टाकत महिलांना स्वच्छतागृह विना शुल्क वापरण्यास परवानगी द्यावी ,अन्यथा मनसे स्टाईलने हिसका दाखवू ,असा संबंधित मक्तेदारास इशारा दिला.यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आगारप्रमुखांची भेट घेवून या गंभीर प्रकाराबाबत संबंधित मक्तेदारावर कारवाई करण्याची परवानगी दिली.
इचलकरंजी येथील मध्यवर्ती बसस्थानकात असलेल्या स्वच्छतागृह वापरासाठी महिलांकडून ५ रुपये शुल्क आकारले जात असल्याची तक्रार मनसे कार्यालयाकडे आली.त्यानुसार आज मनसे महिला आघाडी शहराध्यक्षा स्मिता पवार ,तालुकाध्यक्षा छाया कोरवी ,पद्मावती इंगवले,मनसे शहराध्यक्ष प्रताप पाटील,उपजिल्हाध्यक्ष रवी गोंदकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट मध्यवर्ती बसस्थानक गाठले.त्याठिकाणच्या स्वच्छतागृहाबाहेर जावून पाहणी केली असता महिलांना स्वच्छतागृह वापरासाठी ५ रुपये शुल्क असा फलक पहायला मिळाला.त्यामुळे मनसे महिला पदाधिकाऱ्यांसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अधिक आक्रमक होत त्यांनी याबाबत संबंधित मक्तेदारास जाब विचारत चांगलेच धारेवर धरले.तसेच शुल्क आकाराचा फलक फाडून टाकत महिलांना स्वच्छतागृह विनाशुल्क वापरास परवानगी द्यावी , अन्यथा मनसे स्टाईलने हिसका दाखवू, असा संबंधित मक्तेदारास इशारा दिला.अचानक घडलेल्या या प्रकाराने बसस्थानकातील स्वच्छतागृह परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होवून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकारानंतर संतत्प मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा आगारप्रमुख कार्यालयाकडे वळवला.त्याठिकाणी आगारप्रमुख श्री.काकडे यांची भेट घेवून त्यांना सदरचा गैर प्रकार दाखवून देत संबंधित मक्तेदारावर कारवाई करावी ,अशी मागणी केली.यावर श्री.काकडे यांनी तुम्ही लेखी तक्रार द्या , त्यानंतर तातडीने संबंधित स्वच्छतागृह मक्तेदारावर कारवाई करु ,असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.त्यानुसार मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून आता पुढील कार्यवाहीस सुरुवात झाली आहे.यावेळी सहकार सेना जिल्हाध्यक्ष मनोहर जोशी ,शहाजी भोसले , महेश शेंडे , बाळासाहेब राजमाने , रामचंद्र बागलकोटे , योगेश दाभोळकर , अनिल झाडबुके, रोहित कोटकर ,आनंदा कमलाकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.