You are currently viewing प्रसन्न कांबळीं हे अष्टपैलू व्यक्तीमत्व – जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील

प्रसन्न कांबळीं हे अष्टपैलू व्यक्तीमत्व – जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील

शब्दकोडी पुस्तकाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

रत्नागिरी

शब्दकोडेकार प्रसन्न कांबळी हे अष्टपैलू आहेत.अनेक क्षेत्रात ते काम करत आहेत.त्यांच्या शब्दकोडी या पुस्तकाचे
प्रकाशन झाले.भविष्यात तंत्रज्ञानाचा वापर करून प्रसन्न कांबळींनी शब्दकोड्याचे मोबाईल ॲप तयार करावे असे मला वाटते.शब्दकोडी पुस्तकाच्या रूपाने आज माझी एका हरहुन्नरी व्यक्तीमत्वाशी ओळख झाली असे उद्गार जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी काढले.ते अल्पबचत सभागृहात आयोजित लिम्का बुक विजेते प्रसन्न कांबळी यांच्या शब्दकोडी पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी बोलत होते.
पुढे जिल्हाधिकारी म्हणाले की,कोडी सोडविण्याची सवय असायला पाहिजे.कारण जेव्हा आयुष्यात कोडी पडतात तेव्हा हिच कोडी सोडविण्याचा सराव उपयोगी पडतो.प्रसन्न कांबळी हे हरहुन्नरी व्यक्तीमत्व आहे.ते मोदकही अप्रतिम बनवतात.त्यांनी शब्दकोडी पुस्तकानंतर मोदकाच्या रेस्पिपीचे एक पुस्तक लिहावं असे जिल्हाधिकारी पाटील यांनी सुचविले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांच्याहस्ते शब्दकोडेकार प्रसन्न कांबळी यांचा सत्कार करण्यात आला.शब्दकोडी पुस्तकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांच्याहस्ते झाले.यावेळी कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.श्रीरंग कद्रेकर,शब्दकोडीचे प्रकाशक आणि उद्योजक प्रसन्न आंबुलकर,श्रीदेव भैरीबुवा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे,ज्येष्ठ पत्रकार शेखरकुमार भुते,कोमसाप रत्नागिरी शाखेचे युवक अध्यक्ष दुर्गेश आखाडे व्यासपीठावर उपस्थित होते.
कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.श्रीरंग कद्रेकर म्हणाले शब्दकोडी बनवायला तल्लख बुध्दीमता लागते आणि ती क्षमता प्रसन्न कांबळी यांच्यामध्ये आहे म्हणून ते दहा हजार शब्दकोड्यांचा टप्पा पार करू शकले.पुस्तकाचे प्रकाशक प्रसन्न आंबुलकर म्हणाले की, जेव्हा प्रसन्न कांबळीनी पुस्तकाची संकल्पना मला सांगितली तेव्हा मला आवडली.त्यांचे पुस्तक होतेय याचा मला आनंद झाला.आज लिम्का बुक मध्ये नाव असलेले ते व्यक्तीमत्व आहे याचा आम्हाला अभिमान आहे.भविष्यात त्यांनी गिनिज बुकमध्ये नाव नोंदवावे अशी सदिच्छा व्यक्त करताना पुढील उपक्रमातही त्यांना सहकार्य असेल असे आश्वासन आंबुलकर यांनी दिले. ज्येष्ठ पत्रकार शेखरकुमार भुते यांनी प्रसन्न कांबळी यांच्या शब्दकोडी पुस्तकाला शुभेच्छा देताना वर्तमानपत्रातील शब्दकोड्यांचे महत्व सांगितले.आपल्या मनोगतात शब्दकोडेकार प्रसन्न कांबळी यांनी आपण शब्दकोड्यांकडे कसे वळलो हे सांगताना आपला लिम्का बुक पासून दहा हजार शब्दकोड्यांचा प्रवास मांडताना लवकरच ६२ हजार चौकोनाचे शब्दकोडे तयार करून आशिया बुक मध्ये नाव नोंदविणार असल्याचे कांबळी यांनी ज़ाहिर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोमसाप रत्नागिरी शाखेचे युवक अध्यक्ष दुर्गेश आखाडे यांनी आणि सुत्रसंचालन शकील गवाणकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + eight =