You are currently viewing बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ग्रामस्थ आणि वाहन चालकांचा तीव्र प्रक्षोभ

बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ग्रामस्थ आणि वाहन चालकांचा तीव्र प्रक्षोभ

फोंडाघाट रस्त्यावरील खड्ड्यात उपविभागीय अधिकाऱ्यांना बसवून जाब विचारला !

ठोस आश्वासनानंतर आंदोलन मागे

फोंडाघाट

गेली दीड वर्ष रस्ते-बांधकाम विभागाला स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि ठेकेदारांनी समजावल्यानंतर सुद्धा, अर्ज विनंती करूनही, वृक्षारोपणासारख्या आंदोलनाचा इशारा देऊन सुद्धा रस्ते दुरुस्ती अथवा नवीन करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने, आय टी आय ते एस टी स्टँड आणि चेक पोस्ट ते घाट पायथ्यापर्यंतच्या रस्त्याची मोठाले खड्डे पडून चाळण झाली आहे .गेल्या पंधरा दिवसात बावडा घाट बंद असल्याने याच रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली आहे.त्यामुळे फोंडा घाट- रस्ताही मोठमोठ्या खड्ड्यांनी बाधित झाला आहे.

या मार्गावर खोलवर खड्ड्यांनी अनेक अपघात झाले असून, एकाचा बळी सुद्धा केला आहे. मात्र संबंधित विभाग टेंडर- वर्क ऑर्डर- निधीच्या गर्तेत अडकला असून केवळ आठ- पंधरा दिवसांनी डागडुजी करताना काही ठराविक ठिकाणी गटार न मारता तर काही ठिकाणी मोठे चर मारून पाण्याचा निचरा करण्याचा केविलवाणा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. तर गटार नसल्यामुळे व ग्रामपंचायतीने यावर हरकत घेतल्याने ठेकेदारांनी काम अर्धवट सोडले आहे. किंबहुना बांधकाम विभाग आपले अधिकार वापरून गटार मारणे अपेक्षित होते. मात्र दबावाखाली काम करताना, दुर्लक्ष करणे यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे .वाहतुकीस धोकेदायक बनली असून अखेर ग्रामस्थ, वाहन चालक यांचा प्रक्षोभ बाहेर पडला..

त्यांनी एकत्र जमून उपविभागीय अधिकारी गणेश कर्वे यांना रस्त्यावरील खड्ड्यात खुर्ची देऊन जाब विचारला आणि प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी नेहमीप्रमाणे त्यांनी टेंडर प्रोसिजरचे कारण पुढे केले. यावेळी आजपासून खड्डे जांबा दगडाने भरून,रोलिंग करून वाहतुकीसाठी सुलभ करण्याचे ठेकेदाराला आदेश दिले. अनंत चतुर्थी पर्यंत खड्डे पुन्हा पडल्यास, दोन कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करून, पडलेले खड्डे भरण्याच्या सूचना केल्या. ठेकेदार पवन / समीर भालेकर,बाळा कारेकर यांनी त्यास सहमती दर्शवली.ग्रामस्थांनी यावेळी अधिकाऱ्यांना न बोलवता ठेकेदारांना खड्डे न बुजवल्यास जबाबदार धरले जाईल,असा इशारा दिला.

त्यामुळे गणेश चतुर्थी पर्यंत वाहतूक खड्डेविरहित होतील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त करताना आंदोलन मागे घेतले. आणि आजारी असूनही विनंतीस मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल गणेश कर्वे यांचे आभार मानले. मात्र कार्यकारी अभियंता यांच्या टोलवाटोलवी बद्दल तीव्र खेद व्यक्त करण्यात आला. तसेच चतुर्थी पर्यंत रस्ता- दुरुस्ती नूतनीकरण टेंडर प्रक्रिया पूर्ण करून तातडीने रस्ता काम सुरू करावे अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी शाखा अभियंता दुडये, भाई हळदीने, राजन चीके,सुभाष मर्ये,उमेश रेवडेकर ,गणेश बिडये, संजय आग्रे, हेमंत कोंडेकर ,बाळा पारकर इत्यादी ग्रामस्थांसह वाहन चालक, ठेकेदार उपस्थित होते काही वेळ वाहतुकीचा ही खोळंबा झाला

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × three =