वाहनचालक, पादचाऱ्यांसाठी चिखल पंचमीचा खेळ – सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी
फोंडाघाट
देवगड-निपाणी राज्य महामार्गाची फोंडाघाट हद्दीत पुरती दुरावस्था झाली आहे. फोंडाघाट आयटीआय येथील नांदगाव फाटा ते घाट पायथा असे सुमारे पाच किमी. चा टप्पा पुरता खड्डेमय व चिखलमय बनला आहे. या खड्डेमय रस्त्यातून वाहन चालवण्यासाठी चालकांना कसरत करावी लागत असून त्या प्रयत्नात वारंवार अपघातही होत आहेत. मात्र या सर्व परिस्थितीकडे सा.बां. विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करत असल्याने नागरिक, वाहन चालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्र उत्तर कर्नाटकशी जोडणारा देवगड-निपाणी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून वाहनांची अहोरात्र वाहतूक सुरू असते. यामध्ये चिरे,वाळू वाहतूक करणारा ट्रक, डंपर बरोबरच अवघड साहित्याची वाहतूक करणारे ट्रेलर, टँकर यांचा समावेश आहे. मात्र या महत्त्वपूर्ण मार्गाच्या डागडुजी कडे सा. बां. विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सध्या या मार्गाची पूरती दुरावस्था झाली आहे. मार्गावर ठिकठिकाणी महाकाय खड्डे पडले असून खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून त्यांना डबक्यांचे स्वरूप आले आहे. सहाजिकच मार्गावर चिखल निर्माण झाला आहे. वाहन चालकांना या खड्डयांचा अंदाज येत नसल्याने वाहने खड्डयात आढळून नादुरुस्त होतात तसेच खड्डे चुकविण्याच्या नादात अपघातही होतात.
गेल्या तीन -चार वर्षापासून या मार्गाची अशी दुरवस्था कायम आहे. उन्हाळी हंगामात हे खड्डे डांबराने बुजवले जातात. मात्र, ते कामही निकृष्ट दर्जाचे होत असल्याने पाऊस सुरू होताच खड्डे पूर्ववत होतात, त्यांचा विस्तार वाढू लागतो. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिक, वाहन चालक व व्यापाऱ्यांनी याबाबत अनेक वेळा आवाज उठवूनही त्याची दखल घेतली जात नाही. गेल्या वर्षी फोंडाघाट- हवेलीनगर दरम्यान याच खड्यांमध्ये दुचाकी घसरल्याने रस्त्यावर पडलेला स्वार महिलेच्या डोक्यावरून मागून येणाऱ्या कंटेनरचे चाक गेल्याने महिला जागीच ठार झाली होती. याशिवाय या मार्गावर ठिकठिकाणी झालेल्या अपघातात अनेक वाहन चालक व पादचारी जायबंदी झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी सा. बां. विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या खड्यांमध्ये माती टाकून खड्डे बुजविण्याचे काम केले.मात्र, पावसामुळे ही माती चिखलात बदलून रस्ता निसरडा व चिखलमय बनला आहे. रहादारीवेळी हे चिखलयुक्त पाणी पादचारी व विद्यार्थ्यांच्या अंगावर उडत असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस नाही पडला तर हाच चिखल वाळल्याने वाहनचालक, प्रवासी व पादचाऱ्यांना धुळाचा सामना करावा लागतो.
दोन दिवसांपूर्वी करूळ घाटातील संरक्षण कठडा कोसळल्याने हा घाटमार्ग अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी करूळ घाटातून होणारी सर्व वाहतूक आता फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे. सहाजिकच या मार्गावर वाहतूक दुप्पटीने वाढली आहे. शिवाय फोंडाघाट हा सुरक्षित असल्याने अनेक वाहनचालक या मार्गे कोल्हापूर गाठण्यास पसंती दर्शवतात. मात्र मार्गाच्या दूरवस्थेमुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. गेली अनेक वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या मार्गाला कुणीच वाली नाही का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी विचारला आहे.
फोंडाघाट रस्त्याच्या दुरावस्थेबाबत सार्वजनीक बांधकाम विभागात तक्रार करुन काहीही उपयोग होत नसल्याने १५ ऑगस्ट दिवशी घेणार मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले. राज ठाकरेंचे खळ#$#$#$#फटाक करुन करावे लागणार आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले