You are currently viewing रक्षाबंधन

रक्षाबंधन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…. लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम ललित लेख*

*रक्षाबंधन*

हिंदु संस्कृतीची शिकवण
नात्यातील गोडवा करा जतन
बहिण भावाच्या प्रेमाचा
अतूट धागा रक्षाबंधन

श्रावण पौर्णिमा..राखी पौर्णिमा…. या पौर्णिमेची ओढ लागत नाही अशी बहिणच विरळा..!
श्रावण सुरू झाला कीच या सणाची ओढ लागते. माहेरची सय येते…. श्रावणातल्या त्या रिमझिम पाऊस धारा….निलनभीचे ते सुंदर इंद्रधनुष्य…. पक्षांचा आकाशी विहार…. पानापानातून ओघळणारे ते जलथेंब मोती… हिरवाईने सुंदर लेणे ल्यायलेली ती सुंदरा. … वसुंधरा…. ते डोगरद-यातून धावणारे जलप्रपात…. त्या दुथडी भरून वहाणा-या नद्या …नी सरितेला कवेत घेण्यास उत्सुक तो फेसाळणारा.. निलसागर…. मंदिरातला तो दीपधुपाचा वास….सगळेच कसे मनभावन…
नि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे जवळपास रोजचाच सण…. काहींना काही गोडधोड …. नागपंचमीच्या दिवशीचे ते झाडाला बांधलेले झुले नि त्यावर झुलणा-या आम्ही सख्या…बहिणी…

राखी पौर्णिमेची तयारी तर खूप आधीपासून व्हायची रोज बाजारात फेरफटका….कुठे कशा राख्या आल्या आहेत ते पहाण्याचा कार्यक्रम… निवडण्यात अति चोखंदळपणा…
भावाच्या गो-या हाताला काय शोभून दिसेल…त्याला काय आवडेल…याचा विचार करूनच राखी घेत असू..
राखी…. बहिण भावाच्या नात्यातील गोडवा…माया …प्रेम जपणारा हा सण…. श्रीमंत असो वा गरीब…. बहिण भावांचे प्रेम ..माया..खट्याळपणा…सगळीकडे सारखाच असतो. … भेटवस्तु काय मिळणार यापेक्षा..भावाला ओवाळतांना त्याच्या चेह-यावरचा तो निरांजनाचा प्रकाश…त्यात त्याचा आनंदाने उजळणारा चेहरा… मध्येच कांहीतरी खोडी करण्याची उर्मी….. मनगट पुढे केल्यावर त्याला राखी बांधतांना उफाळून येणारे प्रेम… आपणच जगातले एकमेव भाऊ बहिण आहोत असा चेह-यावरचा भाव….सगळे आठवून मन अगदी भरून येते न!
लहान असूनही हो..हो..मी तुझी रक्षा करणार..असा त्याचा लहानपणीचा… आविर्भाव पाहिला कि हंसूच यायचे. त्याच्या तोंडांत मिठाई कोंबतांना आम्हालाही परमानंद मिळायचा.
आता सगळे वयाने मोठे झालोत. दूर दूर गांवी रहात असल्याने दरवर्षी राखीला भेट होतेच असेही नाही. पण बालपणीच्या आठवणी फोनवर बोलूनच ताज्या केल्या जातात.

सर्वच बहिण भावांचे हे रेशीम बंधन अतूट रहावे… गोड रहावे…. हिच तर शिकवण मिळते न या सणातून!! भाऊ बहिणीचे नाते मानून समाजात ज्यांना बहिण वा भाऊ नाही ,त्यांनाही राखी बांधण्याचा कार्यक्रम सामाजिक संस्थांतून झाला तर एक चांगला पायंडा पडून स्त्रीकडे पहाण्याचा एक चांगला दृष्टीकोन रूढ होईल नी आज समाजात जी विकृती निर्माण झाली आहे तिलाही पायबंद बसेल. सृदृढ निकोप समाजमन तयार होण्यास मदत होईल लष्करातल्या जवानांना आपण राख्या पाठवतो तशाच राख्या अनाथ मुलांच्या संस्थेत जाऊन बांधायला हव्यात तसे कार्यक्रम होतच असतात पण मोठ्या प्रमाणांत व्हायला हवेत.
सर्वच बहिण भावांनी हा राखीचा…मायेचा.. प्रेमळ नात्याचा घेतला वसा टाकू नका… राखी बांधायला विसरू नका… ही सांठा उत्तराची कहाणी.. पांचा …अंहं…. पौर्णिमेची. . रक्षाबंधनाची उत्तरी सफळ संपूर्ण करू या.

सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.

प्रतिक्रिया व्यक्त करा