मुंबई :
भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी भाजप नेते विनोद तावडे यांची निवड झाल्याबद्दल बोरिवली येथे सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होते. यावेळी महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गोपाळ शेट्टी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि उत्तर मुंबईचे भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
विनोद तावडे म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळालं नाही तेव्हा उद्धव ठाकरे, अजित पवार, राज ठाकरे अशा अनेक नेत्यांनी फोन करुन विचारपूस केली. पण भाजप सोड आणि आमच्याकडे ये असं म्हणायची हिंमत कुणीही केली नाही. कारण त्यांना माहीत आहे की मी पक्का संघवाला आहे, विद्यार्थी परिषदेचा आहे.”
“पक्षाने आपल्यासाठी चांगला निर्णय घेतला, तर आपल्याला बर वाटतं आणि जर काही वेगळा निर्णय घेतला तर मग वाईट वाटून घेऊ नये. कारण पक्षाने काही विचार केलेला असतो. जर आज तिकीट दिलं नाही, तर वाईट का वाटलं पाहिजे? मला ज्ञानेश्वरीची ओवी लक्षात आहे. ती अशी की भुंगा लाकूड कुरतडू शकतो, पण तो कमळात अडकला तर त्याच्या पाकळ्या तोडत नाही, तर मग आपण ते का करावं,” असंही विनोद तावडे म्हणाले.
तर कार्यक्रमास उपस्थित प्रवीण दरेकर म्हणाले की, “राजकारणात चढउतार येतच असतात. राजकारणात कुणीही एकाच ठिकाणी राहत नाही. हा सापशिडीचा खेळ आहे. विनोद तावडे यांच्याकडून संयम ही एक गोष्ट शिकण्यासारखी आहे.” “आज विनोद तावडे यांचा राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्याने उत्तर मुंबई भाजपकडून सत्कार करण्यात आला. मात्र, माझी विधानपरिषदच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर उत्तर मुंबईने माझा सत्कार केला नाही,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
तर उलटपक्षी, प्रवीण दरेकरांनी खंत व्यक्त केल्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर विनोद तावडे यांनी देखील भाष्य केलं. ते म्हणाले, “तुमचा मंत्री म्हणून सत्कार करायचा होता म्हणून याआधी तुमचा सत्कार केला नाही. त्यामुळे उत्तर मुंबईच्या अध्यक्षाची पॉवर अंडरईस्टीमेट करु नका. जो येतो तो आपलाच असतो, त्याला आपण आपला करुन घ्यायचा असतो. मला प्रामाणिकपणे वाटत होतं की जी टीम आधीपासून काम करत आहे त्यालाच पुढे घेऊन जायचं. कारण या मतदार संघात उमेदवार कुणीही असला, तरी सात बारावर भाजपचंच नाव आहे.”