You are currently viewing श्रावण मास

श्रावण मास

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री हेमांगी देशपांडे लिखित अप्रतिम लेख

श्रावण महिना म्हटले की डोळ्यासमोर येते ती हिरवी कंच हिरवाई आणि सगळीकडे रिमझिम नारा पाऊस. आषाढा च्या मुसळधार सरींच्या अनुभवानंतर श्रावणाच्या नाजूक रिमझिम त्या पावसाचा आनंद वेगळाच असतो.
श्रावण मास मराठी महिन्यातील पाचवा मास. चंद्र’ श्रवण ‘नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्यादिवशी पासूनश्रावण मासाला सुरुवात होते. आणि पाहता पाहता सृष्टीचे सारे चित्रच पालटून जाते. आषाढ महिन्यात झाडांना वेलींना नवीन पालवी फुटते तर श्रावण महिन्यात त्यांच्यावर बहार येते. असे वाटते जणू वसुंधरेने सुंदर फुल व पान यांची कशीदाकारी केलेली सुंदर हिरवी शालच पांगरलेली आहे.
आषाढाच्या धडधड कोसळणाऱ्या मुसळधार यांचे स्वरूप बदलून त्याचे रूपांतर आता नाजूक रिमझिम त्या सरींमध्ये झालेले असते.
“श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा”
अशा मखमली रेशीम सरींचा स्पर्श आपल्याला श्रावण मासातच अनुभवता येतो.
श्रावण मास म्हणजे हर्ष उल्हासाचा मास. श्रावण मासात सगळीकडे आनंदाचे अल्हाद दायक वातावरण असते.
म्हणून बालकवी म्हणतात,
“श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे”
झाडे ,वेली, पाणी ,फुले, मनुष्यप्राणी सर्वांना श्रावणाच्या रिमझिम नाऱ्या सरी सुखावून जातात.
श्रावणात निसर्गाचा लाडका खेळ म्हणजे ऊन पावसाचा लपंडाव.
“क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे”
एरवी संपूर्ण आषाढ महिन्यात सूर्य ढगा आडच लपलेला असतो. पण श्रावणात त्याला अधून मधून पृथ्वीवर डोकावण्याची संधी मिळते. आणि मग तोही आपले हळदीप्रमाणे पिवळे धम्म होऊन सर्वांवर उधळून लावतो. आधीच नववधूप्रमाणे नटलेल्या हिरवा हिरवाईचा शालू पांगरलेल्या वसुंधरेशी तो उन्हाची हळद खेळतो. कुणी याला ऊन पावसाचा लपंडाव म्हणतात तर कोणी श्रावणातील निसर्गाच्या लीला .काही असो ऊन पावसाचा हा खेळ मात्र मनाला त तजेला आणि प्रसन्नता देतो.
हळदीचे ऊन आणि पावसाच्या या रेशमी सरी आपल्याबरोबर घेऊन येतात ते सप्तरंगी इंद्रधनुष्याचे मंगल तोरण.रिमझिमता पाऊस आणि आकाशातले इंद्रधनुष्याचे मंगल तोरण पाहिले की मोहक पक्षी मोर ही आपला सुंदर पिसारा फुलवून थुईथुई नृत्य करायला लागतो. असे सुंदर विलोभनीय दृश्य आपल्याला श्रावण मासातच बघायला मिळते.
श्रावण मास म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेला मास. त्याचबरोबर श्रावण मास म्हणजे सणांची रेलचेल. नागपंचमी, बहिण भावाच्या प्रेमाची प्रतीक असलेली राखी पौर्णिमा ,जीव तिची अमावस्या, सर्व स्त्रियांची लाडकी असलेली मंगळागौर पूजा, मुलांचा लाडका अर्धी शाळा असलेला श्रावण सोमवार हे सर्व श्रावण मासातच येतात.सर्वांच्या उत्साहाला उधाण आणणारा सण म्हणजे कृष्णाष्टमी व दहीहंडी. अशा लोकप्रिय सणांचा नजराना श्रावण मास खास आपल्यासाठी घेऊन येतो. बैल पोळा श्रावण मासाचा शेवटचा सण असे म्हणतात,
“पोळा आणि पाऊस भोळा”
पोळा झाला की पावसाचा जोर कमी होतो.असा हा श्रावण महिना जाताना आपल्याबरोबर पावसाळा घेऊन जातो आणि जाता जाता आपल्याला गौरी गणपतीची चाहूल देऊन जातो.
स्वास्थ्याच्या दृष्टीने पाहता श्रावण मासात शरीराची पचन क्षमता ही कमजोर झालेली असते. पाणीही गढूळ असते. त्यामुळे पोटाचे विकार बळवण्याची शक्यता असते .म्हणून या महिन्यात पचायला हलके अन्न खाणे आवश्यक आहे. शक्यतोवर उपवास धरावा.
शिवारात हिरवीगार पिके उभी असतात. त्यामुळे शेतकरी ही विसावलेला असतो .श्रावण मासात शेतात वाढलेले हिरवे गार पीक बळीराजा च्या मनात धनधान्य, समृद्धीचे आशा दाई चित्र निर्माण करतो.
श्रावण मासा पासूनच चातुर्मास प्रारंभ होतो. अध्यात्मिक कार्यासाठी हा महिना उत्तम मानला जातो .कारण हा संपूर्ण महिना ‘अष्ट सात्विक भाव’ जागृत करणारा महिना असतो.
श्रावण मास हा नवचैतन्याचा निर्माता आहे.सृष्टीच्या कणाकणात आणि प्राणीमात्राच्या मनामनात त नवचैतन्य निर्माण करणारा मास. निसर्ग सौंदर्य आणि नटलेला, सणांची रेलचेल आणणारा, अध्यात्मिकतेचे महत्त्व समजून सांगणारा महिना म्हणजे श्रावण मास. म्हणूनच
लहान थोर, मनुष्य ,प्राणी, वृक्षवेली सर्वांना हा श्रावण मास हवा हवा असा आणि आनंददायी वाटतो.

सौ हेमांगी देशपांडे
चिंच भवन, नागपुर
मो.7350823742

प्रतिक्रिया व्यक्त करा