*कुडाळ तालुक्यातील माणगांव येथे जम्बो बैठकीच्या हालचाली सुरू*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष होतो का? असा प्रश्न खाकी वर्दीच्या एकंदरीत कामगिरीवरून दिसून येत आहे. जिल्ह्यात अवैध धंदे, चोऱ्या आदी जोरदार सुरू असून खाकी वर्दी मात्र सीसीटीव्ही फुटेज वरून उलगडा झालेल्या एखाद्या केस मुळे स्वतःचीच पाठ थोपटत आहे. परंतु जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जुगाराच्या बैठका सुरू असून तरुणाई बरबादीच्या मार्गावर आहे. खाकीवर्दीकडून त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील घेतोरे गावात खाकी वर्दीच्या गुप्त शाखेला २००० व मुख्य स्टेशनला ३००० असा हप्ता देऊन गेले काही महिने चोरीछुपे जुगाराची मैफिल सजत होती. १ ऑगस्ट पासून खुलेआम बैठक सुरू करण्याचा इरादा जुगाराच्या तक्षीमदारांनी केला असता गावकऱ्यांनी मात्र त्यांचा इरादा उधळून लावला.
घेतोरे गावातील खुलेआम बैठकीचा डाव उधळल्यामुळे तक्षीमदारांनी आपला मोर्चा कुडाळ तालुक्यातील माणगांव येथे वळवून माणगांवमध्ये जम्बो बैठक बसविण्याच्या हालचाली सुरू आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गावागावात सुरू असणाऱ्या जुगाराच्या बैठकांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी सर्वसामान्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.