सुरेश सावंत यांचा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर गंभीर आरोप
कणकवली
ऊस शेतकऱ्यांवर वर्षानुवर्षे अन्याय सुरच आहे मात्र जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत हे कारखान्याची बाजू घेत आहेत. ज्यांचे घर भरून ओतते त्यांना शेतकऱ्यांची फिकीर कशी असणार? परंतु गेली अनेक वर्षे जो खरोखरच अन्याय होत आहे तो मान्य का करत नाहीत? याचा अर्थ साखर कारखानदारांबरोबर त्यांचे साटेलोटे आहेत हे मान्य करावे लागते. हया कारखान्यामुळे किती शेतकऱ्यांचे वाटोळे झाले हे डोळे आणि कान असणाऱ्या माणसाला कळेल. पण ज्यांना शेतकरी मेले तरी काहीही फरक पडत नाही. यांच्यापुढे डोके आपटून पण यांना जाग येणार नाही, अशी टीका भाजपा प्रदेश सदस्य सुरेश सावंत यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचेवर प्रसिद्धी पत्रातून केली आहे.
माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे याच्या आशिर्वादामुळे आम्हाला कोणाच्या वशिल्याची गरज नाही, आणि आम्ही बेईमान सुद्धा होणार नाही ज्यांना संचयनी बँक, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष व जिल्हा परिषद अध्यक्ष ही पदे अनेक वर्षांसाठी बिनविरोध मिळाली त्यांना शेतकऱ्यांचा तोटा आणि नुकसान म्हणजे काय हे कळणार नाही. ज्यांचे घर भरून दार ओतले आहे. त्यांना शेतकऱ्यांचे दुःख कळणार नाही. अशी टीका भाजपा प्रदेश सदस्य सुरेश सावंत यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचेवर केली आहे.
सिंधुदुर्गात गेल्या दहा वर्षात १ लाख १० हजार टन ऊस उत्पादन होत होते ते आता ८३ हजार टन होते. म्हणजे सुमारे ३० हजार टन ऊस उत्पादन कमी झाले . याला जबाबदार कोण ? यासाठी प्रत्यक्ष अनुभव म्हणजे कासार्डेतील श्री. संजय देसाई आणि लोरे येथील श्री.तुळशीदास रावराणे हे आहेत.या शेतकऱ्यांनी ऊस लागवड सोडून अन्य शेती लागव केली.
दरम्यान सतिश सावंत यांना सुरेश सावंत यांनी काही प्रश्न निवेदना द्वारे केले आहे.ऊस तोडणी प्रथम कोकणात सुरू होते की पश्चिम महाराष्ट्रात ? २ ) सिंधुदुर्गात ऊस तोडणीला कधी सुरुवात होते ? ३ ) जो ऊस उशिरा तोडला जातो त्यांचे प्रतिटन ४०० रूपये शेतकऱ्याला कमी मिळतात की नाही ? ४ ) ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस तोडणारी टोळी तसेच ड्रायव्हर यांना टनाला ४०० रूपये द्यावे लागतात की नाही ? ५ ) डी . वाय . पाटील साखर कारखान्याचा वजनकाटा व इतर साखर कारखाने यांच्या वजनामध्ये फरक येतो की नाही ? ६ ) ऊस तोडणी करण्यासाठी शेतकऱ्यांना कितीवेळा आंदोलन करावे लागते ? ७ ) याबाबत आपणाकडे अनेक तक्रारी देऊन सुद्धा आपण लक्ष दिले नाही हे खरे आहे की नाही ? ८ ) पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी एकही रूपया खर्च न होता तोडणी होते , पण कोकणात तोडणीसाठी खर्च येतो हे खरे आहे की नाही ? असे प्रश्न विचारले आहेत.