You are currently viewing बेकायदेशीर सिलिका वाळू उत्खनन

बेकायदेशीर सिलिका वाळू उत्खनन

जि.प. माजी सदस्य संजय आग्रे यांची कंपनी सील; कोट्यावधीची दंडात्मक कारवाई

यापूर्वी विक्री केलेल्या खनिजावरही बसविला दंड

५० ते १०० कोटी पर्यंत जावू शकतो दंड,जाणकारांची माहिती

कणकवली

बेकायदेशीर उत्खननाबाबत खनिकर्म विभाग थेट ॲक्शन मोडमध्ये आला आहे. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सिलिका वाळू व्यवसायिक संजय आग्रे यांची वाघेरी येथील सिलिका मायनिंग कंपनी बेकायदा सीलिका उत्खनन केल्याप्रकरणी सील करून, दंडात्मक कारवाई केली आहे. तो दंड वसूल करण्याचे आदेश कणकवली तहसीलदार यांना पारित केले आहेत.यात पूर्वी विक्री केलेले खनिज सुद्धा अवैध म्हणून घोषित केले असल्याने एकूणच उत्खननावर ही दंडात्मक कारवाई होणार आहे. किमान ५० ते १०० कोटीच्या घरात हा दंड होईल अशी माहिती महसूलच्या जाणकार अधिकाऱ्यांनी दिली.त्यामुळे बेकायदेशीर सिलिका उत्खनन करून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या खान कंपन्यांचे धाबे दनानले आहेत.तर तहसीलदार आर.जे.पवार यांनी आपल्याला या प्रकरणी खनिकर्म विभागाचे पत्र प्राप्त झाले असून दंडाच्या दर पत्रकाप्रमाणे कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कणकवली- वाघेरी येथे मे. सिद्धिविनायक मायनिंग कंपनीच्या नावाखाली बेकायदेशीर रित्या सिलिका उत्खनन केले जात आहे. शिवसेनेचे फोंडाघाट येथील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सिलिका वाळू व्यवसायिक संजय आग्रे, व त्याच्या पत्नी संजना आग्रे हे कंपनीचे भागीदार आहेत.त्याच्यावर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मे.सिध्दीविनायक मायनिंग करिता भागीदार संजय वसंत आग्रे व सौ . संजना संजय आग्रे फोडाघाट यांची कणकवली तालुक्यातील वाघेरी येथे सिलीका सॅण्ड आणि क्वार्टझाईट या गौण खनिजाची माईन्स ५ वर्षे मुदतीचा भाडेपट्टा मंजुर करणेत आलेला होता. आग्रे यांनी खाणपट्टयाबाहेरील खनिजाचा साठा करून त्याची विक्री करत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. दरम्यानच्या कालावधी दि २८ मे २०२२ रोजी झालेल्या पाहणीत वरिष्ठ भूवैज्ञानिक , उपसंचालक यांचे प्रादेशिक कार्यालय , भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय कोल्हापूर यांनी संयुक्त रित्या प्रत्यक्ष पाहनी केली होती. त्यात संजय आग्रे दोषी आढळले होते. त्यामुळे ०३ जून २०२२ च्या पत्राने संचालक भूविज्ञान व खानिकर्म संचालनालय , नागपुर यांना स्थळ पाहणी अहवाल सादर केलेला असता , सदर अहवालामध्ये उक्त नमुद खाणपट्टयामध्ये उत्खननामुळे
तेथे लॅटराइट कटिंग केले आहे.तसेच प्रस्तुत खाणपट्टाधारकाच्या खाणपट्टयामध्ये असलेल्या सिलीका सॅण्ड आणि क्वार्टझाईट या गौणखनिजाच्या साठ्याचे मोजमाप तहसिलदार कणकवली यांचे कार्यालयामार्फत घेतलेले आहे . मे सिध्दीविनायक मायनिंग करिता भागीदार श्री संजय वसंत आग्रे व सौ संजना संजय आग्रे सिंधुदुर्ग या खाणपट्टाधारकाने त्यांचे वाघेरी , ता . कणकवली , येथील गट न . १९ ४४ / १ / १ ९ ४४ / १ / २ , क्षेत्र ४.९ ८ हे . आर . या क्षेत्रामध्ये आतापर्यंत केलेल्या उत्खननाबाबत तसेच विक्री केलेल्या सिलिका बाबत म्हणणे मांडण्याची संधी दिली होती.मात्रा त्यांनी मांडलेली बाजू सुनावणीत योग्य ठरली नाही त्यामुळे वरिष्ठ भूवैज्ञानिक , उपसंचालक यांचे प्रादेशिक कार्यालय , भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय , कोल्हापूर यांनी त्यांचे वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने तसेच त्या खाणपट्टयामध्ये असलेला सिलीका साठा याबाबत सदरच्या खनिज साठ्यास आणि विक्री केलेल्या खनिजास अवैध समजून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
तर खाणपट्टे धारकाने त्याच्या खाणपट्टयामधून आतापर्यंत विक्री केलेले तसेच सदयस्थितीमध्ये खाणपट्टयामध्ये असलेले असे एकूण १ लाख ,२१ हजार ९८१ मे . टन येवढे सिलीका सॅण्ड आणि क्वार्टझाईट हे गौण खनिज अवैध रित्या उत्खनन केल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे संजय आग्रे यांचे वर महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ च्या तरतुदीअंतर्गत कारवाई करणेत येणार आहे.तसे आदेश तहसिलदार कणकवली यांना २८/०७/२०२२ चे पत्रान्वये कळविलेले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा