You are currently viewing दीप … दीप …

दीप … दीप …

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

*दीप … दीप …*

दीप , मार्ग दाखवणारा तो दीप, प्रकाशाकडे नेतो तो
दीप, ज्ञानाचा प्रकाश देतो तो दीप.जीवनातला अध:कार
नष्ट करतो, अज्ञान अंधश्रद्धा दूर करतो तो दीप.एक साधी
अगरबत्ती पेटवली तरी त्या एका बिंदूतूनही प्रकाश फाकतो.
एक पणती, मेणबत्ती पूर्ण घर उजळून टाकते.ह्या इतक्या
छोट्या आकृत्या इतक्या महान आहेत की क्षणात त्या
आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जातात व क्षणात
आपले नैराश्य भीती दूर करतात एवढे सामर्थ्य त्यात आहे.

ह्या दीपांइतकीच दैदिप्यमान माणसे ह्या भारतभूमीत जन्माला
येऊन त्यांनी सारे विश्व प्रकाशमान करून टाकले. किती नावे
घ्यावीत? हा एक एक तारा असा काही प्रखर आहे की “
आचंद्रसूर्य” त्यांचा प्रकाश विझणार नाही एवढे सामर्थ्य त्यात
आहे. दीपपूजा हे कृतज्ञतेचे प्रतिक आहे. जो दीप आम्हाला
तेजाकडे नेतो, ठेचकाळू देत नाही, तो नुसता जवळ असला
तरी आश्वासक वाटतो व सर्व प्रकारची भीती,नैराश्य पळून
जाते, शांत न प्रसन्न वाटतं, त्या दीपा विषयी त्याची पूजा
करून “ तू असाच निरंतर आमच्या वाटेत उभा राहून आमच्या
वाटा प्रकाशमान करीत रहा असेच जणू मागणे आपण त्याची पूजा करून त्याच्याकडे करत असतो नाही का?

आपल्या आयुष्यातील खराखुरा तेजाळणारा दीप म्हणजे
आपली आई. तिचे बोट धरूनच पहिली अडखळती पावले
आपण टाकतो कारण समोर दीपस्तंभासारखी उभी राहून
आपल्याला ती सावरेलच, कधीच पडू देणार नाही याची
ग्वाही तिचे तेजोमय डोळे आपल्याला देत असतात.
ते आश्वासक डोळे आपल्याला धीर देतात, ये ना , मी आहे.
आणि तिच्या डोळ्यातील हे आश्वासन,पडलो तरी चालेल
हे आव्हान स्वाकारायला पुरेसे असते.दुसरा दीप .. आपले
वडील.आईच्या बरोबरीने खस्ता काढणाऱ्या बापाचे कार्यक्षेत्र
फक्त वेगळे असते. कष्टाला तो ही वाघच असतो यात
जरा ही अतिशयोक्ती नाही.आणि तिसरा दीप आपला गुरू
जो खऱ्या ज्ञानप्रकाशाने आपले जीवन अंतर्बाह्य उजळून
टाकतो. म्हणूनच व्यास पौर्णिमेला आपण गुरुचरण धुतो.

मंडळी, ह्या शिवाय अजून असे असंख्य दीप आहेत की,
जे नसते तर आपले काय झाले असते.दिव्याचा शोध
लावणारा गुरू, व विविध प्रकारचे शोध लावणारे संशोधक
आपले दीपस्तंभच नाहीत काय ?हा एक एक दीप म्हणजे
ज्ञानाचा महासागर आहे व त्यांच्याच मुळे आपण आज
इतक्या सुखात जीवन जगतो आहोत .मंडळी, एका दिव्यावरून
हजारो दीप पेटवता येतात त्या प्रमाणे तुमच्या जवळील ज्ञान
इतरांना दिल्याने हजारो सज्ञान होतात. म्हणून दीप हे प्रकाशाचे म्हणजेच ज्ञानाचे प्रतिक आहे.दीप जसा अंध:कार
तम घालवतो व अवघ्या विश्वाला प्रकाशमान करतो तोच
वसा आजच्या दिवशी त्याची पूजा व नमन करून आपण
पुढे चालवायचा असतो म्हणून ही दीप पूजा असे मी तरी
समजते. तुमचे ही हेच मत आहे ना?
चला तर मग आजचा संकल्प..”अज्ञान अंध:कार दूर करण्याचा”व ज्ञानप्रकाश फैलावण्याचाच करू या ना!”
चला, “शुभस्य शिघ्रम्” चांगल्या गोष्टीला उशिर नको ना..?
…… धन्यवाद

आणि हो, ही फक्त आणि फक्त माझीच मते आहेत.

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि:२८ जुलै २०२२
वेळ : दुपारी १: ४२

प्रतिक्रिया व्यक्त करा