जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.शोभा वागळे लिखीत दीप मावस्येचे महत्त्व विषद करणारा अप्रतिम लेख
दीप अमावस्या जीवनातील अंधकार नष्ट करणारी दिव्यांची अमावस्या किंवा आषाढी अमावस्या. आज हे सगळं विसरून तिला सरसकट सगळेच जण “गटारी ” अमावस्या म्हणतात हे अत्यंत चुकीचे आहे.
गतहार म्हणजे गत + आहार
गत म्हणजे मागचे, मागे होऊन गेले,आता नही. आहार म्हणजे भोजन
“गतहार” गटारी नव्हे.
गठहारी कष्ट करी लोक म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांची शेतातली लावणी पेरणी आटोपलेली असते. ह्या दिवसा नंतर सण वारांचे महिने येतात जसे श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक. हे व्रत वैकल्य, पुजा अर्चा करण्याचे दिवस.
दुसरी गोष्ट म्हणजे ह्या दिवसापासून हळूहळू दिवस लहान होत असतात. पुर्वी प्रकाशाचे साधन हे दिवेच असायचे. त्या दिव्यांच्या प्रती आपुलकी व प्रेम भावना प्रगट करण्यासाठी त्यांची पुजा करत. ही आपली परंपरा.
पूर्वी हे दिवे लावायची ठरलेली जागा व त्यांचे विविध प्रकार ही असत. लहान मोठ्या समया, लामण दिवा, निरांजने ,चिमणी, कंदील हे दिवे तेलाने व रॉकेलने पेटवत. त्यांना हवा लागू नये म्हणून काचेचे मस्त कलाकुसरीचे आवरण असत. पेट्रोलने पेटत असल्याने वरती काचेवर काजळी साठायची. ती साफ केली तरच लख्ख प्रकाश पडायचा. ते साफ करणे एक खूप मोठे काम असे. समई, लामणदिवे हे तेलाने पेटवत असल्याने ते चिकट होत व ते साफ करण्या करता राख किंवा रांगोळी वापरावीे लागत. तसेच चिमणी कंदीलची काच साफ करायला साबणाचे पाणी वापरत व नंतर कपड्याने साफ पुसून काढत. हे जोखमीचेच काम असे कारण काच तूटली किंवा तडा गेला तर दिवा कामातून जायचा. म्हणून काळजीपूर्वक काम करावे लागत. आता वीज असल्याने तेवढ्या दिव्यांची गरज नाही. तरी आपली पुरातन परंपरा जपण्याकरता काही लोक अजूनही दिव्यांची पुजा करून त्यांचे आशीर्वाद घेतात.
अमावस्येच्या पहिल्या दिवशी घरातले सगळे दिवे घासून पुसून चकचकीत करतात. वाती सुध्दा अगोदर करून ठेवतात. त्या दिवशी सकाळी देव घरातल्या पुजेला सुध्दा घासलेलीच समई लावायची असते. संध्याकाळी स्वच्छ पाटाभोवती रांगोळी काढून, पाटावर लाल रंगाचा कपडा घालून, तांदळाच्या राशीवर सगळे घासून ठेवलेले दिवे वात तेलाने पेटवतात. यथासांग पुजा करतात. पूरणाच्या किंवा कणकेच्या दिव्याने ओवाळतात. गोड नैवद्य ही दाखवतात. नंतर घरातल्या देवाची आरती करतात. अमावस्येला दिव्यांची पुजा करून सुख, समाधान, लक्ष्मी प्रसन्न होवो म्हणून मागणे करतात. व त्या मागची लक्ष्मीची कथा ही सांगायची प्रथा असते. त्याला दीप अमावस्या म्हणतात.
पण ही पुजा अर्चा सगळं सोडून (काही अपवाद सोडून) गत हारी चे गटारी करून बहुतेक जण भरपूर दारू ढोसून तर्र होतात, तसेच यथेच्छ मांसाहार करतात व अक्षरशा गटारात लोळतात आणि गटारी गटारी करून नाहक त्या जीवांचा बळी घेतात.
हे सगळे सोडा अथवा हळूहळू कमी करत चला. पर्यावरण राखा. दिव्यांची पुजा करा. सुख समृध्दी सर्वांना मिळू द्या अशी अमावस्येला दिव्यांकडे आराधना प्रार्थना करा.
दीप अमावस्येच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
शोभा वागळे.
मुंबई.
8850466717