You are currently viewing प्रिय बाप्पा
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

प्रिय बाप्पा

*काव्य जनक साहित्य समूह संस्थापिका लेखिका कवयित्री आम्रपाली (आमु) घाटगे यांनी गणपती बाप्पाला लिहिलेलं पत्र…!*

प्रिय बाप्पा,
सप्रेम नमस्कार!

पत्रास कारण की, बाप्पा तू आता या दहा दिवसांसाठी पृथ्वीतलावर विराजला आहेस तर म्हटलं तुझ्याशी पत्राद्वारे संपर्क साधावा थोडं मनातलं पानावर उमटावं म्हटलं. म्हणजे लवकरात लवकर माझे पत्र तूझ्या पर्यंत नक्की पोहंचेल. असेही तुझे सध्या सगळीकडे वास्तव्य आहे म्हणून पत्र लिहिण्यास मी घाई केली. अनंत चतुर्दशी विसर्जनानंतर मग एकदा का तू स्वर्गात गेलास की मग माझे पत्र तुझे दूत तुझ्यापर्यंत पोहचवतील की नाही मला थोडी शंका वाटली म्हणून हा खटाटोप करते आहे.

प्रथमेशा, तू व्यवस्थित पोहचलास न बाबा इथपर्यंत? म्हणजे काय आहे न ते रस्त्यातले खड्डे वैगरे तू येताना अनुभवले असशीलच न म्हणून विचारते बाकी काही नाही बघ! तू दहा दिवसांसाठी येणार म्हणून तशी तुझी काळजी घेतलीच असणार! बाकी आम्ही काय कायमचे इकडेच वास्तव्यास असल्यामुळे हमारा कैसे भी चलाता है नव्हे नव्हे नाईलाजाने आम्हाला चालवून घ्यावाच लागतं रे विनायका.

बर ते असो मी इकडे थोडीशी सुखी थोडीशी दुःखी आणि थोडीशी व्यस्त आहे पण मस्तच आहे.
आणि असेही बाप्पा तू तर अंतर्यामी आहेस त्यामूळे तुला खर ते माहितीच आहे हो ना?
गेल्या दोन वर्षात तुझ्यावरही कोरोना महामारी मुळे इकडे येण्यास निर्बंध लादले गेले होते त्यामूळे तू काही येऊ शकला नाहीस मग सांग बरं बाप्पा कसे वाटते आहे तुला आता अवनीवर येऊन? या वर्षी सर्व भक्तांनी तूझ्या आगमनाचे किती उत्सवात स्वागत केले आहे काय तो अन् किती उत्साह बापरे छानच न!
पण बाप्पा खरं खरं सांग हं खरचं या सगळ्याची गरज आहे का रे? या सजावटी मद्ये या मुर्त्यांमध्ये या सगळ्याच धामधुमीत हजारो लाखो शेवटी तुझ्यासोबत विसर्जनातच जाणार ना रे मग काय उपयोग अशा दिखाव्याचा अशा भक्तीचा. बाप्पा तुला माहिती आहे का येऊन गेलेल्या महामारीमुळे सध्या गावांमध्ये, शाळेत जाणाऱ्या मुलांचे काय हाल आहेत? त्यांना शाळेत जाण्या येण्यासाठी वाहनाची सोय नाही, कित्येकांचे जॉब जाऊन बेरोजगारी वाढली आहे, खेडोपाडी तर आज सुध्दा कित्येकांचे खाण्यापिण्याचे हाल होतायेत, तरुणपिढी व्यसनाधीन होते आहे, मुलीच्या लग्नासाठी पैसे नाहीयेत तर कोणी हक्काचे घर नाही म्हणून दुःखी तर कोणाकडे आजारपणावर उपचार घेण्यासाठी पैसे नाहीयेत म्हणून चिंतेत,त्यात भरीस भर म्हणून की काय ऑनलाईन ऑनलाईन अभ्यास वैगेरे म्हणून मोबाईलचा उपयोग झाला खरा पण आता तोच मोबाईल वापर अतिरेक होऊन विद्यार्थी भविष्याचे नुकसान करू पाहत आहे.

काही मजूर वर्गाचं तर असं झाले आहे की कमवायचं आणि मोबाईलमध्ये गमवायचं. बस एक ना दोन अशा भरपूर अडचणींनी आणि समस्याने ग्रस्त झालेला आहे आपला देश. हो हो तू म्हणशील की मग या गणेशोत्सव मुळे नाही का रोजगार मिळत? हो मिळतो न पण तो खुप कमी दिवसासाठी मिळतो नंतर आकरा महिने त्या मजुरांनी, त्या व्यापाऱ्यांनी काय करायचं?
तुला माहिती आहे का गणुजी काही भक्तगण तर या सणांसाठी पैसे व्याजाने, उसने घेतात. अरे पण असं का ? भक्ती श्रद्धा असावी रे पण देवाच्या भीतीने असे काहीही करू नये. त्यांना असं वाटते की नाही केलं तर देव कोपेल किंवा नाराज होइल आणि तू नाराज झाला म्हणजे त्यांना काहीतरी वाईट अनुभव मिळतील, असं तुझ्याच भक्तांचं म्हणणं आहे. आणि त्याच भीतीमुळे या दहा दिवसांसाठी घेतात मग व्याजाने पैसे. पण तुला काय वाटतं बाप्पा हे सगळ बरोबर आहे का?

तूच काहीतरी आयडिया काढ बाबा. श्री आता कर काहीतरी किंवा असे काहीतरी नियम की एका गावात एकच मंडळ किंवा एका एरियात एकच मंडळ आणि तेही अतिशय साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करावा. आणि जर ज्यांच्या जवळ खुप जास्त पैसा आहे त्याने तोच पैसा शाळा,गरजूंना, बेरोजगारांना वाटप करावा. असं दहा दिवसात थोड फार दान धर्म करून काहीही होणारं नाही रे आता गरज आहे सर्वांनी विचार करण्याची आणि परिस्थिती बदलण्याची. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांनी सर्व विसरुन एक होण्याची. ईथे काय न श्री ज्याच्याकडे आहे त्याच्याकडेच आहे आणि ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे काहिच नाही.. आता गजानना बाकी रस्ते,पाणी,आधुनिकीकरण, विकास वैगरे या सगळ्या गोष्टी राजकारणी वाले त्यांना वेळ मिळेल तेव्हा ( त्यांचं सगळ भरून पावेल तेव्हा) पाहायचंय तेंव्हा पाहतीलच. तिथं तर ते तुझेही काही चालू देणारं नाहीत बाबा ते तर तुला चांगलच माहिती आहे त्यामूळे आपण आपलं त्या राजकरण पासून वेगेळे राहिलेलोच बरे हो न देवा! पण घे तूच मनावर आता तेवढ्या गोरगरीबांच्या लेकरासाठी शाळेची सोय कर त्यांच्या भविष्याची चिंता वाटते आहे रे काय शिकावे त्यांनी काय काय अनुभवावे लागते आहे त्यांना त्यांच्या कोवळ्या मनांवर काय बिंबवले जाते आहे पाहतो आहेस तू. काळजी वाटते आहे रे या सर्व गोष्टींची ईथे काय कोणाला कोणाचे काहीही पडलेलं नाहीये जो तो आपापल्या प्रसिध्दी साठी पदासाठी हपापलेला आहे जनविकास सोडून स्वविकास महत्वाचा वाटतो आहे…

काय ती रोषणाई काय तो ढोलताशांचा गजर अन् काय तो जल्लोष सगळं कसं ओक्के मद्ये आहे बघ बाप्पा.

तुझीच एक भक्त
आम्रपाली (आमु)

प्रतिक्रिया व्यक्त करा