You are currently viewing सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ ने “निःशुल्क आरोग्य शिबीराचा” घेतला लाभ

सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ ने “निःशुल्क आरोग्य शिबीराचा” घेतला लाभ

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी या सेवाभावी संस्थेद्वारे शिबिराचे आयोजन

 

सावंतवाडी :

 

सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेद्वारे सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथे आयोजित करण्यात आलेल्या “निःशुल्क आरोग्य शिबीराचा सुमारे ७५ बंदिवानासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांद्वारे सर्वांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले.

सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने गेली १५ वर्षे समाजातील सर्व घटकांसाठी जनजागृतीसह शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य आदी विविध उपक्रम सातत्याने उपक्रम राबविले जातात. कारागृहातील बंदीवानही समाजाचाच भाग असल्याची जाणिव ठेवून सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने यापूर्वी सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथे अनेक उपक्रम बंदिवान बंधू – भगिनींसाठी राबविले आहेत. त्यात बंदिवानांच्या मनोरंजनासाठी टीव्ही देण्यासह सुमारे अडीच वर्षे प्रत्येक मंगळवारी प्रार्थना, योगा, खेळ, प्रबोधनासाठी व्याख्याने, खाऊ वाटप, आवश्यक साहित्य वाटप, आरोग्य शिबीर आदी अनेक उपक्रमांचा समावेश आहे. तसेच सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कारागृहात सुमारे ४ महिने प्रत्येक रविवारी बंदिवान बंधुकरिता प्रार्थना, योगा, खेळ आदी कार्यक्रम राबविण्यात आले होते.

या आरोग्य शिबिरात डॉ शंकर सावंत, डॉ नंददीप चोडणकर, डॉ विशाल पाटील, डॉ राहुल गवाणकर, डॉ सौ मुग्धा ठाकरे व डॉ प्रविणकुमार ठाकरे यांनी रुग्ण तपासणी केली.

यावेळी सर्व बंदीवानांसह अधिकारी तसेच कर्मचारी बांधवांना धनुर्वाताची लसही देण्यात आली. यावेळी कारागृह अधीक्षक संदीप एकाशींगे यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. तर तुरुंगाधिकारी ब्रह्मदेव लटपटे यांनी कारागृह आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले.

या शिबिरासाठी सिंधुमित्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रकाश पाटील, अँड्र्यू फर्नांडिस, दीपक गावकर, विनायक चव्हाण, प्रशांत कवठणकर, रवी जाधव, सिद्धेश मणेरीकर यांनी नियोजन केले. तर कारागृह कर्मचारी सुभेदार विनोद शिरगावकर, विनोद खोडके, हणमंत माने, मोईस जुन्नेदी, गणेश धावडे, रोहिणी पाटील, विनय चव्हाण यांचे सहकार्य लाभले..

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + twelve =