आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कणकवलीत शुभारंभ
५० हजार नवीन सभासद नोंदणीचे उद्दिष्ट
येत्या काळात शिवसेनेची ताकद अजून वाढवणार -आ. वैभव नाईक
कणकवली
आमदार,खासदार हे शिवसेना सोडून गेले असले तरी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी ठाम आहेत. उद्धवजी ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा दर्शविण्यासाठी आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी यांनी शिवसेनेसोबत एकनिष्ठ असल्याबाबतची प्रतिज्ञापत्र देण्यास सुरुवात केली आहे. याचा शुभारंभ आज शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कणकवली विजयभवन येथे करण्यात आला.
त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेकडून नवीन सभासद नोंदणी करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात ५० हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
याप्रसंगी आमदार वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे. जिल्ह्यातील शिवसैनिक व पदाधिकारी हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत ठाम आहेत. शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांची काय अवस्था होते हे यापूर्वी जिल्ह्याने पाहिले आहे. शिवसेनेसोबत एकनिष्ठतेची प्रतिज्ञापत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हजारो पदाधिकारी देत आहेत.खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या सदैव पाठीशी उभे राहणार आहेत.येत्या काळात शिवसेनेची ताकद शिवसेना, युवासेना, महिला आघाडी यांच्या माध्यमातून आम्ही अजून वाढवणार आहोत. येत्या आठ दिवसात शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० हजार नवीन सदस्य नोंदणी देखील करण्यात येणार असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना समन्वयक राजू राठोड, युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, रिमेश चव्हाण, विकास लाड, राजू डोंगरे आदि उपस्थित होते.