साडेनऊ लाखांपेक्षा जास्त युजरनी केले अनसबस्क्राईब
अमेरिकेत मुख्यालय असलेला बहुराष्ट्रीय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स सध्या मोठ्या संकटातून जात आहे.
कोरोना काळात वेगाने लोकप्रिय झालेला नेटफ्लिक्स हा ओटीटी प्लॅटफॉर्म लाखो नागरिक आता वेगाने अनसबस्क्राइब करत आहेत. एप्रिल ते जून २०२२ दरम्यान ९ लाख ७० हजार युझरनी नेटफ्लिक्स अनसबस्क्राइब केले. याआधी जानेवारी ते मार्च २०२२ दरम्यान पण नेटफ्लिक्सने मोठ्या संख्येने युझर गमावले. रशिया आणि युक्रेन यांचा संघर्ष सुरू असताना नेटफ्लिक्सने रशियातील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे नेटफ्लिक्स वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली. यातून नेटफ्लिक्स अद्याप सावरलेले नाही.
सातत्याने सबस्क्रायबर गमावत असलेल्या नेटफ्लिक्सने नव्या योजना जाहीर करून सबस्क्रायबर वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे संकेत दिले. पण या प्रयत्नांना किती यश मिळेल याबाबत नेटफ्लिक्सच्या शेअर होल्डरमध्ये साशंकता असल्याचे समजते.
नेटफ्लिक्स २०२३ मध्ये जाहिरातींसह टीझर आणि पेड शेअरिंग ऑफर लाँच करणार आहे. याव्यतिरिक्त आणखी किमान एक-दोन आकर्षक योजना नेटफ्लिक्स २०२३ मध्ये लाँच करणार असल्याचे वृत्त आहे.
नेटफ्लिक्स या कंपनीची स्थापना १९९७ मध्ये झाली. आधी सिनेमा आणि नाटकांच्या डीव्हिडी भाडेपट्टीवर पुरवणाऱ्या नेटफ्लिक्सने मोबाईल क्रांती झाल्यावर ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मनोरंजन पुरविण्यास सुरुवात केली. कंपनी २०११ पासून २०२१ पर्यंत चांगली कामगिरी करत होती. पण २०२२च्या पहिल्या सहा महिन्यांत कंपनीच्या सबस्क्रायबरच्या संख्येत मोठी घट झाली आहे. या संकटातून सावरण्याचे मोठे आव्हान कंपनीसमोर आहे. नेटफ्लिक्स आता काय करणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.