सिंधुदुर्गनगरी
मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या संबंधाने दिनांक 10 ऑक्टोबर 2020 रोजी बंद पुकारण्यात आला आहे. तसेच दिनांक 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा सुस्थितीत, नियोजनबद्ध तसेच चोख पार पाडण्यासाठी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1)(3) नुसार मनाई आदेश व परीक्षा केंद्राच्या 200 मीटरच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे कलम 144 लागू करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 10 ते 12 व दुपारी 3 ते 5 या कालावधीत कणकवलीतील विद्यामंदीर माध्यमिक प्रशाला, कणकवली कॉलेज आणि एस.एम.हायस्कूल या तीन उपकेंद्रांवर राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 ही परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा सुस्थितीत व नियोजनबद्ध तसेच चोख पार पाहण्यासाठी कणकवलीचे कार्यकारी दंडाधिकारी रमेश पवार यांनी परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार पुढील कृत्ये करण्यास मनाई केलेली आहे. परीक्षास्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस या परिसरात प्रवेश करता येणार नाही. परीक्षा केंद्र व त्याच्या 200 मीटर परिसरात सर्व झेरॉक्स केंद्र चालू ठवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच फॉक्स, ई-मेल व इंटरनेट सुविधा व इतर कोणत्याही संभाषणाचा अगर कोणत्याही पत्र व्यवहाराच्या सुविधांचा वापर करता येणार नाही. परीक्षा केंद्राच्या 200 मीटरच्या परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एस.टी.डी., आय.एस.डी. ध्वनीक्षेपक सुरू ठेवण्यास मनाई करण्यात येत आहे.
तसेच बंद आंदोलन व राज्य सेवा पूर्व परीक्षा संबंधाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जिल्ह्यातील जातीय सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था आबाधीत रहावी याकरिता जिल्हादंडाधिकारी यांनी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) नुसार पुढील कृत्य करण्यास मनाई केली आहे. शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दांडे. बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बाळगणे, अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे, किंवा तयार करणे, व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने अक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजविणे. पाच अगर पाच हून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणुका काढणे, सभा घेणे यास मनाई असेल.
ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्य व अधिकार बजावणीचे संदर्भात वरील वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्ती पोलीस अधिक्षक, सिंधुदुर्ग अगर संबंधित उप विभागीय पोलीस अधिकारी यांना संबंधित विभादाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस अधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे. आशा व्यक्तींनी आणि लग्न इत्यादी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यास लागू राहणार नाही.
या कालावधीत मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना असणार आहेत.
वरील आदेशाचा भंग केल्यास संबंधितांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 135 नुसार कारवाई करण्यात येईल असे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक ए.के. धनावडे हे कळवितात.