जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री- आसावरी इंगळे, (जामनगर) लिखित अप्रतिम कथा
सकाळी तिला जरा उशिरानेच जाग आली. राघो शालूच्या उठण्याचीच वाट पाहत होता. त्याला बाहेर जायचे होते. तिची प्रकृती ठीक नसल्याने त्याने तिला उठवलं नव्हतं. किती काळजी घेतो राघो आपली? मग कामिनीची अशी अवस्था का? या प्रकरणाचा छडा लावणं भाग होतं. तो निघणार इतक्यात तिला घेरी आली. शालूला पुन्हा मातृत्वाची चाहूल लागली होती. राघोच्या आनंदाला पारावर उरला नव्हता! महत्वाचे काम असल्याने त्याला बाहेर जायलाच लागणार होतं. नोकरांना शालूची काळजी घ्यायला सांगून तो बाहेर गेला. तो गेला तसे शालूने आन्हिकं आटोपले. नोकरांना सूचना देऊन ती आतल्या जिन्याने वर गेली.
जुईचा ताप कमी होता. ती ग्लानीत होती.
“थंक्स शालू.. मी तुझे उपकार जन्मभर विसरणार नाही.” कामिनीच्या डोळ्यात पाणी होते.
“बस कर कामिनी. काय झालंय काय तुला? सारखी उपकाराची भाषा? चुरस होती आपल्यात परंतु आपण कॉलेजमध्ये मैत्रिणी होतो, विसरलीस का?”
कामिनी काहीच बोलत नाही पाहून शालूच पुढे बोलली.
“आणि..तुझी अशी अवस्था? मी तर कल्पनाही करू शकत नाही.. काय आहे काय हे सगळं?”
त्यानंतर कामिनीने सांगितलेली व्यथा ऐकून शालूच्या पायाखालची जमीनच सरकली.
राघोशी लग्न करून कामिनी राघोच्या घरी आली. गावातील राघोचा मानमरातब, बंगला, नोकर चाकर पाहून तीही हरखली होती. लग्नानंतरचे पहिले सहा महिने कसे निघाले तिला कळलेही नाही. गावात नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने तिचे घरच्यांशी संबंध कमी झाले होते. आईवडिलांनाही इतक्या दूर येणे झेपणारे नव्हते. सहा महिन्यांनी तिला मातृत्वाची चाहूल लागली. राघो तिची खूप काळजी घेऊ लागला. एक दिवस राघो तिला तपासणीसाठी डॉक्टरांकडे घेऊन गेला होता. पोटातील गर्भाची वाढ अपुरी असल्याने व काही गुंतागुंत आढळल्याने तिचा गर्भपात करण्यात आला होता. दुसऱ्या, तिसऱ्या वर्षीही काहीसे असेच झाले. चौथ्या वर्षी मात्र मशीनमध्ये बिघाड झाला की काय पण तिचा गर्भपात झाला नव्हता. बाळंतपण होईपर्यंत राघोने तिला फुलासारखे जपले होते. तिला जुई झाली आणि राघोचं खरं रूप समोर आलं होतं. पहिले तर त्याने डॉक्टरांना धारेवर धरलं. घरी आल्यावर तो जुईला मारायला निघाला होतं. तिचं तोंडही राघोला दिसणार नाही, या कामिनीच्या आश्वासनानंतर जुईला जीवदान मिळालं होतं. तेव्हापासून जुई राघोसमोर येणार नाही, याची काळजी ती घेत असे. त्यानंतरच्या वर्षी तिला दिवस गेले आणि पुन्हा डॉक्टरकडे नेण्यात आले. यावेळेस मात्र कामिनी सावध होती. आपल्या गर्भातील बाळ मुलगी आहे म्हणून आपला गर्भपात करण्यात येतो आहे, हे तिच्या लक्षात आलं. पण ती हतबल होती. जुईचा जीव राघोच्या हातात होता. त्यानंतर जुईच्या बदल्यात अजून दोनदा तिचा गर्भपात करण्यात आला होता. सलग गर्भपाताने कामिनी गळून गेली होती. तिच्या गर्भात जीव पेलण्याची शक्ती नाही, हे डॉक्टरांनी सांगितले तेव्हा तिची पिळवणूक थांबली. पण तेव्हापासून राघोचे तिच्याशी पूर्णपणे वागणे बदलले. तो तिच्याशी फटकून वागू लागला होता. त्याची गावातील महिलांचा कैवारी म्हणून असलेली पत जाईल म्हणून तिला घरात टिकवणे त्याची गरज होती.
त्याला घराण्याला वारस हवा होता. त्यासाठी त्याला दुसरा विवाह करण्याशिवाय पर्याय नाही, असं त्याने कामिनीला सांगितलं…कामिनीने विरोध करायचा प्रश्न नव्हताच. जुईला घेऊन वेगळं होणं शक्य नव्हतं. तिच्यात तेवढी ताकद उरली नव्हती. आत्मविश्वास केव्हाच हरवला होता. आईवडिलांशी संपर्क होऊ शकत नव्हता. त्यांना राघो फारसा पसंत नव्हताच. त्यांनी संबंध तोडले नसले तरी नात्यात दुरावा निर्माण झाला होता. नेटवर्क समस्या असल्याने प्रथम काही वर्ष तिचा त्यांच्याशी कमीच संपर्क होता. नंतर नंतर राघो परस्पर त्यांना उत्तरे देत असे. इतक्या वर्षांनी फार काहीच संपर्क नसताना एकदम माहेरी जायचं तिला मनातून पटत नव्हतं. नोकरी मिळण्याइतके शिक्षण झाले नसल्याने व नोकरीचा कुठलाही पूर्वानुभव नसल्याने जुईला घेऊन एकटं जगणं तिला शक्यही नव्हतं. जुईला जगवण्यासाठी तिला राघो म्हणेल तसं वागण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे राघोने दुसऱ्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा तो मान्य करणं एवढेच तिच्या हातात होते. तरीही तिच्याकडून ती त्याचे दुसरे लग्न होऊ नये, असाच प्रयत्न करणार होती. इतर कुणाचं जीवन उध्वस्त झालेले तिला पहावणार नव्हतं. म्हणून राघोने जेव्हा शालूशी विवाह करणार असे तिला सांगितलं तेव्हा तिने शालूला स्वतःहून फोन केला होता. त्याच्याशी विवाह करण्याचा विचार सोडून द्यायची विनवणी केली होती पण त्याचा काही फायदा झाला नव्हता! त्याने शालूकडे प्रेमाचं जाळं फेकलं होतं आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणेच शालू त्याच्या जाळ्यात अलगद फसली होती.
*(क्रमशः)*