You are currently viewing अमर प्रेम

अमर प्रेम

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. शैलजा करोडे लिखित अप्रतिम कथा*

 

*अमर प्रेम*

———————

लग्नानंतरचा माझा पहिलाच सण आज होता वटपौर्णिमा . लग्न सोहळा ,त्यानंतरचे विविध देव दर्शन , नातेवाईकांच्या भेटीगाठी , नवीन सुनेचं कोडकौतुक यातच पंधरा दिवसाचा कालावधी निघून गेला होता .महिन्याची सुट्टी मी व निलेश ने घेतलेली .आता आम्हांला वेळ हवा होता एकमेकांना समजून घेण्याचा , नवजीवनाची स्वप्ने पाहण्याचा , कल्पनेच्या पंखावर स्वार होण्याचा .

 

आमच्या दरवाज्यावर टकटक झाली.

निलेशने दरवाजा उघडला . काका शिरीष आले होते .

” काय करतेय आमची नव परिणित जोडी ” आणि काका मिश्कीलपणे हसत होते . ” काय काका , तुम्हीही चेष्टा करताय लेकरांची “. “तसं नाही रे , पण नवपरिणित दांपत्याला एकांत हवा कि नको , त्याचीच सोय लावून आलोय .आता दुपारच्याच फ्लाईटने तुम्हांला गोव्याला जायचेय .मिरामार बीचवर हाॅटेल फाॅर्चून मध्ये पाच दिवसांचं बुकिंग केलंय तुमचं .सो गाइझ , आँल दि बेस्ट अँन्ड एन्जाॅय “. मी व निलेशने जोडीने काकांचे चरणस्पर्श केले .

 

हाॅटेलमधील रूम अँलोट झाली , आम्ही सामान ठेवलं अन फ्रेश झालो. हाॅटेल रेस्टाॅरंटमधून चहा मागवला .चहा पितांनाच निलेशने माझ्या कमरेभोवती हात टाकला .” हे काय निलेश , सोड ना ” ” आता कशाला सोडायचं , जन्मभराची साथ आहे आमची ” ” अरे हो , पण प्रवासानं दमलेय ना मी “. ” अग , मग तुझा थकवा दूर करतो ना मी , पाय चेपू कि डोक्याला बाम लावू “.माझा चेहरा गोरामोरा झाला होता . चेहर्‍यावर नकळत भितीचं सावट पसरलं होतं .अंगावर शहारे आले होते . ” काय झालं निलिमा , काय होतंय तुला , घाबरू नकोस सखी , तुला त्रास होईल असलं कोणतंही वर्तन मी करणार नाही  ” म्हणत निलेशने माझ्या चेहर्‍यावर दोन्ही हात ठेवले , डोळ्यात डोळे घालून पाहू लागला , त्या डोळ्यात मला दिलासा देण्याचा प्रयत्न होता , विनंती होती , आर्जव होतं .” निलिमा तू थोडा आराम कर . मग सायंकाळी थोडं दोना पावला बीचवर फिरून येऊ . त्यानंतर मस्तपैकी जेवण करू .

निलेशच्या समंजस स्वभावाने मला बराच धीर आला होता ,

 

” अहो माझी बहीण हेमानं निलिमासाठी स्थळ सुचवलंय .मुलगा उच्च शिक्षित आहे . आर्म फोर्समध्ये फ्लाईट लेफ्टनंट आहे . माणसे सुस्वभावी आहेत .निलिमाची आई ज्योती तिच्या बाबांशी , प्रकाशरावांशी बोलत होती .” नाही ज्योती , मला नाही आर्मीतील मुलाला मुलगी द्यायची .सगळं काही चांगलं असलं तरी जीवाची हमी शुन्य असते याठिकाणी . माझी एकुलती एक मुलगी .तिच्या भवितव्यावर नेहमी टांगती तलवार नको आहे मला .” ” अहो पण एकदा मुलगा तर पाहून घ्या आणि निर्णय निलिमाला घेऊ द्या ना तुम्ही “, ” तुम्ही आणि तुमची बहीण काहीही करा दोघीजणी .” प्रकाशरावांनी विषय तिथंच संपविला होता .पण देखणा , राजबिंडा , उच्चशिक्षित , आर्मफोर्समधील निलेशला पाहाताच निलिमा प्रभावित झाली . गोरीपान , नीळे डोळे , काहीसे सोनेरी केस , उच्चशिक्षित , बँक अधिकारी असलेली निलिमा निलेशलाही भावली .मग कोणतंही देणंघेणं , हुंडा , मानपानाशिवाय ,तसेच पत्रिका जमवणं या सोपस्कराशिवाय शुभमंगल पार पडलं होतं .

 

उद्या आपण सगळ्या जणी जरीकाठाच्या साड्या व मॅचिंग ज्वेलरीसह येऊ आँफिसला .माझी सहकारी आशा विधाते बोलत होती . “जरीकाठाची साडी ठीक आहे , पण रंग मात्र कोणताही असू दे . त्याचं बंधन नको बाई “. शलाका परांजपे बोलत होती . ” ठीक आहे ना , रंग आपापल्या पसंतीचा ” मीनाक्षी देशमुख म्हणाली .विद्या घोडके व आरती पाटील आँफिस प्यून सावित्रीसह हळदी कुंकवाचं साहित्य व वाण खरेदीसाठी आज जाऊन आल्या होत्या .

 

निलिमा तू हळदीकुंकू लाव सगळ्यांना .  हेमा लोखंडे बोलत होती “नको आज माझी तब्येत बरी नाही . शलाका लावेल हळदीकुंकू ” आशा विधातेने हेमाचा तळहात दाबून खूण केली हे निलिमाच्या नजरेतून सुटले नाही .

तीळाचे लाडू व नाष्टा सगळ्यांनी सेवन केला . उखाण्यांचाही कार्यक्रम झाला .उखाणा घेण्याचा नंबर निलिमाचा आला . आणि सगळ्याजणी शांत झाल्या . ” मी घेते ना उखाणा . निलेश येणार परत . त्याला काहीही झालेलं नाही . शत्रूंनी त्याचं विमान उडवलं , तो बेपत्ता झाला . त्याचा ठाव ठिकाणा नाही कि त्याची डेड बाॅडीही मिळाली नाही . माझं प्रेम मला सांगतय तो जीवंत आहे आणि येणार परत . घेते मी उखाणा .

 

” नवपर्वाची पहाट होऊन निलेश आला माझ्या जीवनी

तूच माझा सखा अन मी तुझी अनुरागिणी ”

 

निलिमाने उखाणा तर घेतला पण दोन अश्रू तिच्याही नकळत गालावरून ओघळले होते .

हेमा , विद्या , शलाका यांनी हळूच निलिमाच्या खांद्यावर हात ठेवला .” आय अँम ओ के , मला काही झालेलं नाही . आय अँम हॅपी ” निलिमा उद् गारली . ” होय निलिमा तुला काही झालेलं नाही . आता जायचं का आपण . ” आणि सर्वजणी आँफिसातून बाहेर पडल्या .

 

अक्षय तृतीयेसाठी निलिमाने आँफिसला रजा टाकलेली .यादिवशी भगवान विष्णू चे पूजन , जप , नामस्मरण , उपवासादी कर्म ती करायची . गरीबांना दान स्वरूप मातीचे भांडे , जवस , आंबा , छत्री , पादत्राणे , कपडे इ. वाटायची . यादिवशी केलेलं दान अक्षय असतं व दुपटीनं आपल्याकडे परत येतं यावर तिचा ठाम विश्वास होता . आणि असंच अक्षय प्रेम माझं निलेशवर आहे आणि तो येणारच ही तिची दृढ मनोधारणा होती .सगळा विधी यथासांग पार पडला अन तिनं सुटकेचा निःश्वास सोडला.

 

नेहमी मरगळलेल्या निलिमाच्या चित्तवृत्ती आज फुलून आल्या होत्या .हे तिलाही जाणवत होतं . आरशातील तिचं प्रतिबिंब तिलाच नवखं वाटलं .

 

आणि दुपारी आर्मफोर्सच्या आँफिसातून फोन आला होता .घनदाट जंगलात टेहळणी करतांना एका आदिवासी पाड्यावर निलेश सापडला होता . पण त्याचा पूर्ण स्मृतिभ्रंश झालेला .

शत्रूंनी त्याचं विमान उडवलं अन विमान भेलकांडत खाली येत असतांनाच निलेशने उडी मारली . पण जमिनीवर आदळतांना मेंदूला मार बसून त्याचा स्मृतिभ्रंश झाला होता .ही माहिती त्या आदिवासी पाड्यावरील लोकांनी दिली होती .

“आम्ही येतो निलेशच्या भेटीला” , निलेशचे बाबा पतंगराव बोलत होते .

” बाबा आम्ही निलेशलाच घरी घेऊन येतोय . कदाचित घर व आपली माणसं पाहून त्याची स्मृती परत येईल .

 

निलेश आपल्या रूममध्ये आराम करीत होता . निलिमाची चाहुल लागताच त्याची झोप चाळवली .” कोण ? काय हवंय तुम्हांला ?” निलेश असं काय करतोस ? आपल्या निलिमाला विसरलास ? अन त्याचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेऊन तिने नजरेला नजर भिडवली .आणि त्या अपरिचित डोळ्यात एक चमक आली , ओठांवर हास्य आलं . स्पर्शाची ऊब कळली ,श्वासातला आपलेपणा जाणवला आणि निलेशला सगळं काही उमगलं . ” माझी निलू ” म्हणत त्यानं तिला आपल्या बाहुपाशात ओढलं .

निलिमचं गहिरं प्रेम आज जिंकलं होतं . सुखाचा अक्षय ठेवा तिला पुन्हा मिळाला होता .

———————————————

शैलजा करोडे ©®

नेरुळ नवी मुंबई

मो.9764808391

प्रतिक्रिया व्यक्त करा