You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे होणार पूरस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे होणार पूरस्थिती

*सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन ठप्प…आपत्कालीन विभाग सुशेगाद*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री पासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा पावसाने झोडपून काढला आहे. मागच्या वर्षी असाच जोरदार पाऊस होऊन कित्येक वर्षांनी मुंबई गोवा महामार्गावर वागदे, पावशी आदी ठिकाणी प्रचंड प्रमाणावर पाणी आले होते. अनेकांचे त्यामुळे फार मोठे नुकसान झाले होते.

 

पाऊस सुरू झाल्यावर सुशेगाद असणारे जिल्हा प्रशासन, आपत्कालीन विभाग पूर आल्यावरच जागा होतो, तोपर्यंत पाणी पुलाखालूनच नव्हे तर पुलावरून गेलेलं असतं. परवा रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने बांदा बाजारपेठेत पाणी आले असून व्यापाऱ्यांची दुकाने पाण्याखाली गेली आहेत. सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठेत देखील पाणी घुसले आहे. रविवारी पुराच्या पाण्यात आंबोली गेळे येथे विवाहिता वाहून जात असता, पोलीस दत्तात्रय देसाई मदतीला धावले, त्यामुळे महिलेचे प्राण वाचले होते. जिल्ह्यात होणारी अतिवृष्टी आणि प्रशासनाची तयारी पाहता जिल्हा प्रशासन ढिम्म आणि आपत्कालीन विभाग सुशेगाद असल्याचे दिसून येते.

महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला भूकंप आणि नवीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जरी निवडले गेले तरी मंत्रिमंडळ आणि खातेवाटप अजून जाहीर न झाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून जिल्ह्यात पूरस्थिती होऊनही जिल्हा प्रशासनावर कोणाचाही वचक नसल्याचे दिसत आहे.

 

जिल्ह्यात निवडणुका आल्यावर जागृत होणारे राजकीय पदाधिकारी शांत असून राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनाही सामाजिक जाणिव राहिलेली नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आपत्कालीन विभागात कोणीही अलर्ट नाही. जिल्हा प्रशासनाने वेळीच होणाऱ्या अतिवृष्टीची दखल घेऊन अलर्ट राहणे आवश्यक आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा