You are currently viewing नापणेत ऊस संशोधन केंद्र उभारणीचा मार्ग सुकर कोकण कृषी विद्यापीठाकडे जमिनीचा ताबा

नापणेत ऊस संशोधन केंद्र उभारणीचा मार्ग सुकर कोकण कृषी विद्यापीठाकडे जमिनीचा ताबा

वैभववाडी

नापणे येथे मंजूर असलेल्या ऊस संशोधन केंद्रासाठी लागणारी जमीन संबंधित विभागाच्या ताब्यात बुधवारी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांनी ही कार्यवाही केली आहे. कोकण कृषी विद्यापीठ यांच्याकडे आता रीतसर या जमिनीचा ताबा गेल्याने ऊस संशोधन केंद्र उभारणीचा मार्ग सुकर झाला आहे.
तालुक्यात ऊस संशोधन केंद्र मंजूर झाले आहे. वैभववाडी तालुक्यासह कणकवली, राजापूर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात ऊस शेती केली जात आहे. वैभववाडी तालुक्‍यातील प्रलंबित धरणांची कामे मार्गी लागल्यास ऊस लागवडीच्या क्षेत्रात आणखी वाढ होणार आहे. वाढती ऊस शेती लक्षात घेता वैभववाडीत ऊस संशोधन केंद्र सुरु व्हावे, अशी अनेक शेतकऱ्यांची मागणी होती. तालुक्याच्या आमसभेत शेतकऱ्यांनी या केंद्राचा मुद्दा वारंवार उपस्थित केला होता. भाजपा आ. नितेश राणे,यांच्या पाठपुराव्यामुळे नापणे येथे ऊस संशोधन केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. मात्र अनेक तांत्रिक अडचणीमुळे या कामाला गती येत नव्हती. ऊस संशोधन केंद्रासाठी असलेली नियोजित जागाही सरकारी हक्क म्हणून होती. केंद्र चालू करण्यासाठी सदर जागा ही शासनाने कृषी विभाग कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या ताब्यात देणे क्रमप्राप्त होते. सदर ठिकाणी असलेली 6. 98 हेक्टर इतकी जागा ताब्यात मिळावी अशी मागणी संबंधित विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. सदर जमिनीची 23 लाख 52 हजार 958 इतकी रक्कम संबंधित विभागाने शासन महसूल विभागाकडे जमा केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी नापणे येथील जागा ऊस संशोधन केंद्राच्या ताब्यात द्या असे आदेश वैभववाडी तहसीलदार यांना दिले होते. बुधवारी तहसीलदार रामदास झळके, मंडळ अधिकारी श्री. पावसकर, तलाठी सोनू सावंत यांनी सदर जागा ऊस संशोधन केंद्राच्या ताब्यात दिली आहे. यावेळी ऊस संशोधन केंद्राचे प्रतिनिधी विनायक शेट्ये व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 2 =