You are currently viewing महसूल कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार कारभाराचा शेतकऱ्यांना फटका…

महसूल कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार कारभाराचा शेतकऱ्यांना फटका…

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा न झाल्यास मनसे करणार तीव्र आंदोलन…  कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे

कुडाळ

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पुरसदृष्य परिस्थिती उद्भवून शेतकऱ्यांच्या भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. सदर नुकसानीबाबत मा.राज्यपाल महोदयांनी हेक्टरी आठ हजार रुपये नुकसान भरपाई रक्कम जाहीर करुन प्रस्ताव करणेसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या होत्या. त्याअनुषंगाने जिल्ह्यात संबंधित गावचे ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व तलाठी यांच्या संयुक्त समितीने पंचनामे करून शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रे जमा करून देखील घेतली होती. त्यामधील तलाठ्यांकडून जे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे 31 मार्च 2020 पूर्वी सादर झाले ते मंजूर होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम अदा करण्यात आली परंतु प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात काही गावांमधील तलाठ्यांनी कामात दिरंगाई करून अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव आपल्याच ताब्यात ठेवून विहित वेळेत संबंधित तहसील कार्यालयाकडे सुपूर्द केले नसल्याने अद्यापही बहुतांश शेतकरी भात पीक नुकसान भरपाई रक्कम मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. एकीकडे शासनाकडून शेतकऱ्याना नुकसानीपोटी अत्यल्प मदत जाहीर करून शेतकऱ्यांचा हिरमोड केला तर दुसरीकडे कामचोर कर्मचाऱ्यांनी बेजबाबदार पणा दाखवत शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले. महसूल कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार कारभाराकडे जिल्हाधिकऱ्यांचे लक्ष वेधणार असून कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाईची मागणी करणार आहे.सद्यस्थित कोरोना आपत्तीमुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था व चालू हंगामातील अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान याचा विचार करता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मदतीची नितांत गरज आहे. त्यामुळे आगामी दिवाळी सणापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर भात पिकात नुकसानीची रक्कम जमा न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलनाचा पवित्रा हाती घेईल अशी माहिती मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 5 =