जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री सौ आशा भावसार यांचा अप्रतिम ललितलेख
संध्याकाळची वेळ होती .सूर्य डोंगराच्या आड क्षितीजाच्या पल्याड सरकत होता. पशुपक्षी, गायी वासरे आपल्या पिल्लांच्या ओढीने मोठ्या व्याकुळतेने आपल्या घराकडे जात असताना पायांनी उडणार्या मातीचा सुगंध दरवळत होता.आकाशात मावळतीचा सुंदर नयनरम्य देखावा दिसत होता.आसमंती गुलाल उधळल्यागत वाटत होते. सूर्य ढगाआड जातो न जातो तोच शितल चंद्राची छोटीशी कोर आकाशात विराजमान होती कीती विहंगम हे दृश्य..आणि अशा वेळी मी आवरून सावरून हे दृश्य पाहत दारात उभी होते तोच अंतर्मन गुणगुणू लागलं…..
*झाल्या तिन्ही सांजा करुन* *शिणगार साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा..*
आणि खरंच माझे मन आणि डोळे आतुरतेने पतिराजांची वाट पाहत होते कारण आज आयुष्याच्या प्रत्येक क्षणी एकमेकांची साथ देण्याचे सात वचन घेऊन म्हणजे त्यांची अर्धांगिनी होऊन १८ वर्षे पूर्ण झाले होते. दिवसभर लग्नातील सोनेरी क्षण,त्या सनई-चौघड्यांचें मंजुळ स्वर माझ्या मनाला धुंदी घालत होते.माझे ते नववधूचे रूप… आणि तो नवरदेवाचा भारी रुबाब…तो आनंदाचा सोहळा, एकमेकांना दिलेला आधार आणि सुख दुःखातील सोबत या सर्व आठवणींचा मनी जणू पिसारा फुलला होता…यातच दिवस कसा निघुन गेला कळलेच नाही.
घरातील सर्वांनी म्हणजे सासू-सासरे मुले यांनी आम्हा दोघांना सरप्राईज देण्याचे ठरविले होते आणि त्यांची दुपारपासूनच मोठी लगबग सुरू होती त्यांनी सर्व घर एवढे सजवले होते की जणू स्वप्नातील महालच वाटत होता…हे सर्व पाहून वाटत होते…
*स्वर्ग हा नवा वाटतो हवा…*
आमची एनिवर्सरी काय तो मोठा थाट .. रंगबिरंगी रिबिनी, रंगबिरंगी फुग्यांच्या माळा… जणू आयुष्यातील रंग-बिरंगी अनुभव एका माळेत गुंफले…
केक तर खूपच सुंदर त्या वरील मोर मोरनी ची जोडी बघून मला लग्नातील आम्ही दोघेच वाटत होतो.. किती सुंदर तो पिसारा…आणि किती ऐटदार तो तूरा…मोरणी नवतारुण्याने बहरलेली, त्याला साजेशी नाजूक कोवळी.. अन् लाजरी…
सर्वांनी खूप जोशात आनंदात आमची अनिव्हर्सरी साजरी केली.जेवणखाण आटपून आम्हाला त्यांनी गच्चीत नेले तिथेही इतकी सजावट काय सांगू…..
आम्ही दोघे ही बघताच भारावून गेलो…. काळ्याकुट्ट मखमली अंबरात तो शुभ्र चांदवा आणि त्याच्या त्या असंख्य अबोल सख्या चांदण्या जणू रासक्रीडा खेळत आहे असे भासत होते, आणि परसातील जाईजुई, रातराणीचा सुगंध मनाला मोहून टाकत होता. निशिगंधाची पाती जणू एकमेकांना आलिंगन देत होती… अवखळ वारा मनाला अलगद प्रेमाचा स्पर्श करून जात होता…अशा सुखद वातावरणात आमचीही बेधुंद धमाल चालू झाली..मूलीनीं यूट्यूब वर गाणी चालू केली….कोणी गाणे म्हणत होते तर कोणी नाचत होते वयाचे भान न ठेवता घरातील सर्वजण, माझी सासू ,सासरे आणि माझ्या दोन गोड पर्या त्यांच्यासोबत आम्ही दोघेही बेधुंद होऊन नाचू गाऊ लागलो. नात्यांची झुल बाजूला ठेवून स्वच्छंदी मनाने बेधुंदपणे मनमुराद आनंद लुटला…
अशीही बेधुंद पणाची एक लहर सर्वांच्याच मनात आनंदाचा वर्षाव करून सर्वांना चिंब चिंब करून गेली….
वैशाखातील वनव्याने व्याकूळ धरेला जशी आषाढाची एक सर तृप्त करते तसेच बेधुंद पणाची एक लहर ही आपल्या मरगळ दूर करून आयुष्यातील आनंद
द्विगुणित करते….
*बेधुंद मनाच्या लहरी*
*स्वप्नातील सुंदर सरी*
*सत्यात साकारत सारी*
*आयुष्याची बाग बहारी*
सौ. आशा सचिन भावसार जालना.