जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ ज्योत्स्ना तानवडे यांची अप्रतिम काव्यरचना
( वृत्त — चंद्रकांत )
निरव शांतता भरुन राहिली एकाकी रात्री
रातकिड्यांचा सूर भेदतो शांततेस रात्री
किती पाहती वाट सख्याची आतुरली गात्रे
एकांताचे सौख्य लाभता सुखावली गात्रे
जणू पसरला चांदणचूरा महालात माझ्या
चांद प्रितीचा प्रकाशला तो महालात माझ्या
आश्वासक तो स्पर्श बोलला गुपीते मनाची
आणाभाका घेताना बघ साक्ष दो मनाची
संसाराची रेखिव स्वप्ने होती दोघांची
साक्षात पुढे उभी राहिली सृष्टी दोघांची
या भेटीतुन ये आकारा नाते जन्माचे
लाभले मला मनाजोगते इप्सित जन्माचे
ज्योत्स्ना तानवडे.
वारजे,पुणे.५८