You are currently viewing मालवण मेढा-कोथेवाड्यात पावसाचे पाणी तुंबले, अनेक घरांना धोका…

मालवण मेढा-कोथेवाड्यात पावसाचे पाणी तुंबले, अनेक घरांना धोका…

गटार, व्हाळ्यांची साफसफाई तत्काळ करा ; अन्यथा आंदोलनाचा ममता वराडकर यांचा इशारा…

मालवण

गटारांसह, व्हाळ्यांची साफसफाई न झाल्याने मुसळधार पावसात शहरातील मेढा, कोथेवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. पावसाचे पाणी वस्तीत घुसल्याने मेढा, कोथेवाड्यातील काही घरांना धोका निर्माण झाला आहे. व्हाळ्याची, गटारांची साफसफाई करण्यासाठी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने स्थानिक माजी नगरसेविका ममता वराडकर यांच्यासह नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान पालिका प्रशासनाने तत्काळ गटार, व्हाळ्यांची साफसफाई न केल्यास स्थानिक नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सौ. वराडकर यांनी दिला आहे.

दरवर्षी पालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी शहरातील गटार, व्हाळ्यांची साफसफाई केली जात होती. मात्र यावर्षी पावसाळा सुरू झाला तरी काही ठिकाणच्या व्हाळ्या वगळता अन्य ठिकाणच्या गटारांची, व्हाळ्यांची साफसफाई झाली नाही. परिणामी गेले दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मेढा, कोथेवाडा भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी तुंबले आहे. यात व्हाळ्यांची साफसफाई न झाल्याने पावसाचे पाणी वस्तीत घुसल्याने घरात पाणी घुसत असल्याने या भागातील काही घरांना धोका निर्माण झाला आहे.

मेढा येथील मौनीनाथ मंदिर, दोन पिंपळ, कोथेवाडा येथील गटारात मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा तसेच व्हाळ्यांची साफसफाई झाली नसल्याबाबत सात दिवसांपूर्वी पालिका प्रशासनास छायाचित्रे पाठवून लक्ष वेधत तत्काळ गटार व व्हाळीची साफसफाई करण्याची मागणी करण्यात आली. मात्र पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यानेच मेढा, कोथेवाडा भागात पाणी तुंबले असून काही घरांना धोका निर्माण झाला आल्याचे स्थानिक माजी नगरसेविका ममता वराडकर यांनी सांगितले.

दरम्यान आज माजी नगरसेविका ममता वराडकर, सामाजिक कार्यकर्ते मोहन वराडकर यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न केले. येत्या काही दिवसात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यास अनेक घरात पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तत्काळ या भागातील गटार, व्हाळ्यांची साफसफाई करण्याची कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा सौ. वराडकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा