सावंतवाडी
पावसाळ्यात दुषित पाणी आणि डासांमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, त्यामुळे सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांनी केले. दरम्यान पावसाळ्यात मलेरिया ( हिवताप ) , डेंग्यू , चिकुनगुन्या , हत्तीरोग यासारखे किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे रुग्णांनी तापसदृश्य आजारांवर त्वरित वैदयकीय उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. याबाबत डॉ. सावंत यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, पावसाळ्यात पाणी साठे वाढून डासांचा प्रादुर्भाव वाढतो . मलेरिया ( हिवताप ) , डेंग्यू , चिकुनगुन्या, हत्तीरोग यासारखे आजार डासांमार्फत पसरतात. तीव्र ताप, तीव्र थंडी, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, उलटी, जुलाब यासारखी लक्षणे या आजारामध्ये आढळून येतात. त्यामुळे कोणतेही लक्षण दिसल्यास त्वरित रक्त तपासणी करणे व औषधोपचार घेणे आवश्यक आहे. डासांची पैदास साठलेल्या व साठवलेल्या पाण्यात होते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असे पाणीसाठे नष्ट करणे, साठलेले पाणी, डबकी वाहती करणे, साठलेल्या पाण्यात ऑईल टाकणे अथवा गप्पी मासे सोडणे तसेच भंगार साहित्य, टायर यासारख्या वस्तूमध्ये पाणी साठून डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते असे पाणीसाठे नष्ट करावेत. मच्छरदाणीचा वापर करणे, खिडक्या, दारे, संडासचे व्हेंट पाईप यांना जाळी बसवणे आदी उपाययोजना कराव्यात व कोणतेही तापसदृश्य लक्षण असल्यास त्वरित उप जिल्हा रुणालय, सावंतवाडी येथे तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.