You are currently viewing दुसऱ्यांचे यशापयश आपल्याला बोधप्रद असते : सुषमा ठाकूर पाटणकर

दुसऱ्यांचे यशापयश आपल्याला बोधप्रद असते : सुषमा ठाकूर पाटणकर

(अमेरिकेतील जगातील सर्वात मोठ्या बँकेच्या उपाध्यक्षा सिंधुदुर्ग कन्या सुषमा ठाकूर- पाटणकर यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद)

कुडाळ :

“दुसऱ्याचे यशापयश आपल्याला बोधप्रद असते आणि दुसऱ्याच्या अपयशातून बोध घेत आपण आत्मविश्वासपूर्वक यशाचा मार्ग निवडला पाहिजे. मात्र कठोर श्रमास पर्याय नाही.दुसऱ्या बद्दल मत बनविताना त्या व्यक्तीला समजून घ्या. निगेटिव्ह गोष्टीकडे फोकस न करता सकारात्मक विचार करा .यशस्वी लोकांकडून आपल्या कौशल्याबाबत जाणून घ्या .असे उद्गार जगातील सर्वात मोठी अमेरिकन श्रीमंत बँक असलेल्या जे. पी .मॉर्गन बँकेच्या उपाध्यक्षा सुषमा ठाकूर -पाटणकर यांनी काढले.त्या बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होत्या. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये कुणाच्या वाईट गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता त्यातील चांगल्या गोष्टी हेरून त्या आत्मसात करा. *हे मला जमणारच नाही. हा न्यूनगंड टाका* आपली कोणीही कितीही हेटाळणे केली तरी आपले प्रयत्न सोडू नका. प्रगती करण्यासाठी इंग्रजीची भीती बाळगू नका तिला सामोरे जा. मग तीची भीती आपोआपच दूर होईल. खडतर मार्गावरून चालत यशस्वी झालेल्यांचा आदर्श समोर ठेवा; मात्र एखादा प्रगतीचा मार्ग निवडताना त्यातील धोके अगोदर ओळखा म्हणजे मार्गात संकट येणार नाहीत. आणि आली तर ती दूर करता येतील.

 

आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात *तंत्रज्ञानाचा आपण कसा वापर करतो यावर यश अवलंबून आहे*. असे सांगत विद्यार्थ्यांना विविध उदाहरणातून यशाचा मूलमंत्र दिला. मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत प्रामाणिकता आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर कष्ट करण्याची तयारी असेल तर या जगात कठीण काहीच नाही शंभर टक्के प्रयत्न करा आणि मग देवाला हाक मारा तो नक्कीच तुम्हाला यशस्वी बनवेल आणि त्याच बरोबर आपल्या प्रगतीमागे आपल्या आई-वडिलांच्या असलेल्या शुभेच्छा,त्यांचा त्याग, आशीर्वादही महत्त्वाचे असतात.त्याचा विसर पडू देऊ नका. आपले ध्येय निश्चित करा व झपाटून कामाला लागा असे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व तरुण भारतच्या सिंधुदुर्ग आवृत्तीचे प्रमुख शेखर सामंत यांनाही धन्यवाद दिले. त्यांच्यामुळे आपण आपणा -सर्वांशी संवाद साधू शकले .त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आणि उपस्थितांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आपण अंधारात चाचपडत असलेल्या, यशाची वाट शोधू पाहणाऱ्या मेहनती व टॅलेंटेड मुलांसाठी वेगळे प्रयत्न करणार असल्याचे सूचित केले. उमेश गाळवणकर, शेखर सामंत यांनी सुद्धा एका सामान्य खेडेगावात जन्मलेल्या सुषमा ठाकूरच्या गरुड झेप चे कौतुक करत तिचा आदर्श आजच्या पिढीने समोर ठेवून ध्येय निश्चित करावे, असे आवाहनही उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

यावेळी व्यासपीठावर सुषमा ठाकूर चे पती रितेश पाटणकर तिचे वडील पी.व्ही ठाकूर व त्यांचे कुटुंबीय, बॅ.नाथ पै फिजियोथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरज शुक्ला, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी, कला वाणिज्य व विज्ञान महिला आणि रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज सी.बी.एस.ई सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य शुभांगी लोकरे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रणाली मयेकर हिने केले. तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांचा बॅ नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा