*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ ज्योत्स्ना तानवडे यांचा अप्रतिम लेख*
*!! दृष्टीदान !!*
माझ्या सासऱ्यांचे वयाच्या ९० व्या वर्षी २००३ साली निधन झाले. त्यावेळी आम्ही त्यांचे नेत्रदान करविले. त्यामुळे त्यांच्या निरोगी दीर्घायुष्याची सुंदर सुफल सांगता झाली.त्यानंतरच्या १५ऑगस्टला त्या नेत्रपेढीने कृतज्ञता म्हणून नेत्रदात्यांच्या नातेवाईकांना बोलावले होते.त्यावेळी थोडेसे बोला असे सांगितले होते.
अगदी थोड्या वेळात काय बोलावे हा विचार करताना घर ते हाॅस्पिटल या १५-२० मिनिटांत एक कविता सुचली.तिथे गेल्यावर ती एका कागदावर लिहून काढली आणि कार्यक्रमात वाचली होती. आजही एका नेत्रपेढीत तिचा बोर्ड लावला आहे.
*!! नेत्रदान !!*
आलेला प्रत्येक जणच जातो
ठरवून दिलेल्या वाटेने
मागे रहाणारा दु:खी होतो
विरहाच्या वेदनेने ||
देहाचे या लेणे
ईश्वराचे देणे
त्यांचे त्याला समर्पित
करावे श्रध्दाभावाने ||
रिक्त येसी रिक्त जासी
जाण इतरांच्या वेदनेसी
नश्वर देह आत्मा अविनाशी
स्मृती चिरंतन कर्मयोगाची ||
समाजकार्याच्या ओंजळीत
आपुलाही एक मोती
मांगल्याचे तेज पसरो
स्नेहाची ज्योती ||
जाता जाता पुण्य घडो
राखण्या ईश्र्वराचा मान
उजळण्या दोन नेत्रज्योती
करूया नेत्रदान ||
ज्योत्स्ना तानवडे.
प्रत्येकाला एक ना एक दिवस हे जग सोडून जायचे आहे. पण आयुष्यात असे काही तरी करावे की जगण्याचे सार्थक होईल.
हा निरोगी देह लाभला ही ईश्वराची मोठी कृपा आहे. वेळ झाली की तो जाणार हे ठरलेले आहे. पण त्याने केलेले चांगले काम मात्र मागे कायम रहाते.
आपण आपले समाजऋण फेडून ईश्वरी कृपेचा मान राखायला हवा. अनेक मार्गाने आपण समाजाचे उतराई होऊ शकतो. त्यासाठीच नेत्रदान करायचे हा संकल्प खूप मौल्यवान आहे. आपल्या एकाच्या नेत्रदानाने दोन जणांना दृष्टी मिळते. आपल्या आयुष्यात पुरेपूर आनंद घेतल्यानंतर आपल्या पश्चात दोन जणांच्या मार्फत आपले डोळे हे सुंदर जग बघणार आहे ही किती अद्भुत गोष्ट आहे.तेव्हा अवश्य नेत्रदानाचा संकल्प करूया. आपल्या आयुष्याची सफल सांगता करण्याचा या सारखा सहजसोपा मार्ग नाही.
आम्ही तर नेत्रदानाचे संकल्पपत्र भरलेले आहे. तुम्ही पण अवश्य भरा. एखाद्याने नसेल भरलेले तरी त्याचे जवळचे नातलग त्याचे नेत्रदान करवू शकतात. आम्ही नेत्रदान जागृतीचे काम एका नेत्रपेढीसाठी १३-१४वर्षें केले आहे. आमच्या घरातील पाच जणांचे आणि ओळखीतील १०-१२ जणांचे नेत्रदान करविले आहे. तेव्हा आजच संकल्प करूया.
उजळण्या दोन नेत्रज्योती
करूया नेत्रदान !!
ज्योत्स्ना तानवडे.पुणे.