जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमाराणी यांची अप्रतिम काव्यरचना
काळोखातील निखारे
भासे मज रक्त फुले
दाह वेदनेचा जळे
कळ अंग अंगी झुले
भोवताली किर्र झाडी
घाव कु-हाडीचा साहे
तुटतांना फांदी फांदी
पानोपानी अश्रू वाहे
भेगाळल्या जखमेत
स्वप्नाच्या ढलप्या पडे
रित्या विहिरीत उगी
वाजे रिते पाणी घडे
अंधारल्या वाटेवर
अंकुशी बाभळ काटे
रानी भेगाळल्या दरी
चालतांना भीती वाटे
मनभरे निखारेच
पेटतच राहतात
चित्रविचित्र विचार
पानोपानी वाहतात
डोळाभर धूर दाह
अश्रू वाहे जलगंगा
रातकिडे यळकोट
गर्द रात्री करी दंगा
काळोखातील निखारे
वा-यासवे हसतात
मन मळ्यातील विंचू
रानभर डसतात
फांदी तुटे गळा फास
लाव्हा ओजंळी निखारे
मीही आता निखा-याच्या
सा-या वेदना धिकारे
निखा-यात भाजतांना
मीही बनतो कनक
संकटाशी लढतांना
मीही होतसे टणक
©मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.