*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री डॉ.मृदुला कुलकर्णी (खैरनार) यांची अप्रतिम काव्यरचना*
अष्टाक्षरी रचना
*संवाद…..*
गोड चाहूल लागता
जीव हुरहूर होई
रूप गोजिरे मनात
मग होणार ती आई!
दिसणार कोणापरी?
असणार काय बाई
काळजाचा तुकडा तो
होऊ कशी उतराई?
रोज संवाद साधता
एक होती दोन मने
जाणतात भावनाही
एका नाळेची स्पंदने!
एका क्षणी प्रश्न येतो
खोल आतून हुंकार
आहे तुझी पणती मी
नाही ना ग तुला भार?
अंगावर काटा येई
नाही बाळे नाही मुळी
तूच आधार आमचा
नाही खुडणार कळी?
आनंदला जीव छोटा
घेई गिरकी खुशीत
मंद तेवतो प्रकाश
उदराच्या गाभाऱ्यात !
डॉ. मृदुला कुलकर्णी (खैरनार)©
पुणे. 19/05/22