भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचा सवाल, पालकमंत्र्यांवर अविश्वास दाखवणारे पारकर त्यांच्या विरोधात उपोषण छेडतील काय?
कणकवली :
शहरात सर्विस रस्त्यावर असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तीन महिन्यात स्थलांतरीत करण्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. पण कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळेच संदेश पारकर यांना आपल्या पालकमंत्र्यांवर विश्वास नसल्यामुळे व केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी हा पुतळा स्थलांतरीत करण्यासंदर्भात राजकीय इश्यू मिळावा याकरिता पुतळा स्थलांतरण या विषयी वेळ काढू भूमिका घेतली जात आहे. त्याचाच भाग म्हणून संदेश पारकर यांनी जि प मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत पुन्हा एकदा राजकीय स्टंटबाजी सुरू केली आहे. असा टोला भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी लगावला. गेली तीन वर्षात पालकमंत्री उदय सामंत यांनी अनेकदा आश्वासने दिली. तीन महिने होऊन सुद्धा पालक मंत्री पुतळा स्थलांतर करू शकले नाही. पालकमंत्री आश्वासन देऊन काम पूर्ण होत नाही हे पारकर यांना पक्षाच्या वरिष्ठांना दाखवायचे असून, यातूनच संदेश पारकर यांनी पालक मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करू शकत नाही हे सिद्ध करून दाखवण्यासाठी जि प मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केला. मुळात संदेश पारकर हे एका समितीचे उपाध्यक्ष आहेत. व समिती उपाध्यक्ष म्हणून पारकर यांच्या ताब्यात शासनाला जागा देता येणार नाही. तरी पण जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी पारकर यांनी ही जागा पुतळ्यासाठी द्यावी अशी मागणी करून जनता व शिवप्रेमींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. पालकमंत्र्यांनी ज्या 20 गुंठे जागेमध्ये पुतळा स्थलांतरण करण्याचे आदेश दिले व त्या जागेचा सर्वे संदेश पारकर यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी पारकर यांनी या सर्वे करिता विरोध देखील केला नव्हता. आता ज्यावेळी या विषयात भाजप मार्फत आम्ही उपोषणाची नोटीस दिली त्यानंतर पारकर यांना जाग कशी काय आली? म्हणजेच पुतळा स्थलांतरण करण्या मागचा पारकर यांचा हेतू व उद्देश हा वेगळा सांगण्याची गरज नाही. 20 गुंठे शासकीय जागेत पुतळा स्थलांतरण करा अशी मागणी करून गोरगरीब व्यापाऱ्यांना विस्थापित करत त्यांच्या रोजीरोटी वर पाय देण्याचा प्रयत्न पारकर यांच्याकडून सुरू आहे. सद्यस्थितीत जी मोकळी जागा आहे त्या जागेवर पुतळा स्थलांतरण करणे शक्य आहे. पण पारकर यांना व्यापाऱ्यांना विस्थापित करून कुठेतरी ही व्यापारी आपल्यापर्यंत धावत कसे येतील हे पाहायचे आहे. भाजपने उपोषणाची नोटीस दिली त्यानंतर पारकर यांना छत्रपतींच्या पुतळ्याची जाग आली. मग त्यांच्या पालकमंत्र्यांकडून दिलेले आश्वासन पूर्ण करून घेण्यासाठी पारकर पालकमंत्र्यांच्या विरोधात उपोषण करण्याची हिंमत दाखवतील काय? असा सवाल भाजपा शहर अध्यक्ष अण्णा कोदे यांनी उपस्थित केला आहे.