You are currently viewing परतुनि येई

परतुनि येई

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी यांची अप्रतिम काव्यरचना

*वृत्त— मालिनी(नमन नमन मानावा यमाचा यमाचा)*

हसत हसत येशी तू असा संकटाते
नकळत मग बाहेरी निघू छान वाटे
तुजसह फिरताना मुक्त आनंदभावे
तुजविण जग सारे बोचणारेच काटे

मन वचन तनाने ना कधी दूर झालो
जवळच असतानाही प्रपंची बुडालो
क्षणिक जगरहाटीच्या निळ्याशार डोही
रमत गमत डुंबोनी फिरूनीच आलो

तळमळ मजसाठी जाणवेही कळेही
कळकळ वचनाने व्यक्त होता वळेही
अहमहमिकतेचा वाद होता कधी ना
मज तुज रमताना का कुणा पाहवेना?

स्मरण सुखद गोष्टींचे पुन्हा आज होते
तव सय मज येता आठवे पेच गुंते
परतुनि कधि येशी रे सुटे धीर माझा
तडक जवळ ये मित्रा पुसी लोचनाते

—हेमंत कुलकर्णी
मुलुंड, मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 15 =