You are currently viewing चारचाकी-मोटारसायकल अपघातात लादी कामगाराचा जागीच मृत्यू, एक गंभीर…

चारचाकी-मोटारसायकल अपघातात लादी कामगाराचा जागीच मृत्यू, एक गंभीर…

सावरवाड येथील घटना ; पोलिसांत अपघाताची नोंद…

मालवण

मालवण कसाल मार्गावरील सावरवाड लक्ष्मीनारायण मंदिर येथील वळणावर चारचाकी व मोटारसायकल यांच्यात धडक बसून काल रात्री अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलस्वार विक्रम महलाद कुमावत (वय- २६, रा. राजस्थान) या लादी कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारसायकलवरील विनोद गोदूराम सुरेला (वय-४० रा. राजस्थान) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलवण्यात आले आहे. अपघातात मोटारसायकलचा चक्काचूर झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री मालवण वायंगणी येथील विक्रम कमलाकर परब हे आपल्या ताब्यातील महिंद्रा थार (एम. एच. ०७ एसी ३२२२) ही घेऊन ओरोस येथून मालवणच्या दिशेने येत होते. त्याच वेळी कट्टा येथून ओरोसच्या दिशेने निघालेले लादी कामगार विक्रम कुमावत व विनोद सुरेला यांच्या मोटारसायकल ( एम. एच. ०७ वाय ९१५७) याची धडक महिंद्रा थार गाडीला बसली. मोटारसायकल वरील दोघेही रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले. विक्रम परब तसेच स्थानिकांनी रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. या दरम्यान मोठी गर्दी अपघातस्थळी झाली. पोलीस पाटील संतोष जामसंडेकर हेही घटनास्थळी दाखल झाले. कट्टा व मालवण पोलिसांना या अपघाताची माहिती देण्यात आली. दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र विक्रम कुमावत याला मृत घोषित करण्यात आले तर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या विनोद सुरेला याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे नेण्यात आले.

पोलीस निरीक्षक विजय यादव, पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, बाबा गिरकर, दिलीप खोत तसेच कट्टा दुरक्षेत्राचे सुनील चव्हाण, सिद्धेश चिपकर हे घटनास्थळी दाखल झाले. अपघाताच्या स्थितीवरून मोटारसायकलस्वार हे आपली बाजू सोडून चुकीच्या दिशेने मोटारसायकल चालवत असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान अपघाताची नोंद येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा