पाऊस गेल्या काही दिवसांपासून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमा भागामध्येच आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास १२ ते १३ जूनच्या जवळपास मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ढगाळ वातावरण असल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे.
मान्सूनला मंगळवारी किंचित गती मिळाली आहे; परंतु, अद्याप त्याची वाटचाल धिम्या गतीनेच सुरू आहे. कर्नाटकातून तो महाराष्ट्राच्या दिशेने निघाला, मात्र हवेचा दाब अजूनही अनुकूल नसल्याने तळकोकणात येण्यास शनिवार उजाडेल, असा नवा अंदाज हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केला आहे.
मान्सून गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देत आहे. १६ मे रोजी तो अंदमानात दरवर्षीच्या तुलनेत सहा दिवस आधी आला. त्यापुढे प्रगती करत केरळमध्येही २९ मे रोजी तीन दिवस आधीच दाखल झाला. मात्र त्यानंतर त्याचा प्रवास रेंगाळला. अरबी समुद्रात हवेचा दाब जास्त असल्याने तो कर्नाटक किनारपट्टीवर गेल्या १२ दिवसांपासून रेंगाळला होता. मंगळवारी अखेर त्याने किंचित गती घेत महाराष्ट्राच्या दिशेने कूच केले. मात्र, त्याची गती अतिशय कमी आहे.
केरळमध्ये दरवर्षी पेक्षा पाच दिवस आधी म्हणजे २७ मे रोजीच मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं आधी वर्तवला होता. असनी चक्रीवादळामुळे मान्सूनला गती मिळाल्याचं हवामानतज्ज्ञांनी स्पष्ट केलं होतं. पण मग जलद सुरुवात केल्यावर मान्सूनचा वेग काहीसा मंदावला आणि आता २९ मे रोजी मान्सूनचं केरळात आगमन झाल्याचं अखेर हवामान खात्यानं जाहीर केलं आहे.
आता साहजिकच महाराष्ट्रात मान्सून कधी येणार, याची सगळेच वाट पाहत आहेत. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यावर साधारण सात दिवसांत म्हणजे सात जूनपर्यंत तो महाराष्ट्रात येतो. यात काही तीन-चार दिवसांचा फरक पडू शकतो. यंदाही पाच ते दहा जूनदरम्यान महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता काही हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.