You are currently viewing सजग ग्राहक निर्मितीसाठी कार्यशाळांची गरज- वैशाली राजमाने.

सजग ग्राहक निर्मितीसाठी कार्यशाळांची गरज- वैशाली राजमाने.

वैभववाडी

ग्राहकांचे संघटन, प्रबोधन आणि त्याला योग्य मार्गदर्शन करण्याचे काम ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून केले जाते.सजग ग्राहक निर्मितीसाठी संस्थेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. ग्राहकांनीही आपली फसवणूक होऊ नये म्हणून सजग रहावे. फसव्या व खोट्या जाहिरातींना ग्राहकानी बळी पडू नये. आपली फसवणूक झाल्यास गप्प न राहता योग्य ठिकाणी तक्रार केली पाहिजे. सजग आणि सुजाण ग्राहक निर्मितीसाठी अशा प्रबोधन कार्यशाळांची गरज आहे असे प्रतिपादन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी केले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग व सिंधुदुर्ग जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक २ जून रोजी कणकवली येथील महाराजा हॉटेल सभाग्रहात एक दिवशीय विभागीय ग्राहक प्रबोधन कार्यशाळा संस्थेचे राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सौ.वैशाली राजमाने बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे राज्य संघटक श्री. सर्जेराव जाधव, राज्य सचिव श्री.अरुण वाघमारे, तहसीलदार आर. जे. पवार, नगराध्यक्ष समीर नलावडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे, जिल्हा ग्राहक मंचाचे माजी अध्यक्ष कमलाकांत कुबल, अध्यक्ष कोकण विभाग अध्यक्ष व राज्य सदस्य प्रा. श्री. एस.एन. पाटील, जिल्हा संघटक सीताराम उर्फ दादा कुडतरकर, उपाध्यक्ष एकनाथ गावडे, सचिव संदेश तुळसणकर, तालुका अध्यक्ष नामदेव जाधव, अशोक करंबळेकर, सौ.पुनम देसाई, सौ.प्रणिता वैराळ, उपाध्यक्षा श्रद्धा कदम, संघटक शितल मांजरेकर, रवींद्रनाथ मुसळे, मनोहर पाळयेकर, विजय गावकर, सचिव महानंदा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्राहकांना त्यांचे हक्क व अधिकार समजून सांगण्यासाठी कार्यशाळेच्या आयोजनाचा उपक्रम स्तुत्य आहे. कणकवलीत संस्थेचे कार्यालय सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मनोगतात सांगितले. यावेळी तहसीलदार आर. जे. पवार,पोलीस अधीक्षक राजेंद्र हुलावळे यांनीही मनोगत व्यक्त करून कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या.
दुसऱ्या प्रबोधन व मार्गदर्शन सत्रामध्ये संस्थेचे राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी ‘संस्थेची तत्त्वप्रणाली व संस्थेचा कार्यकर्ता’, वीजवितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. बाळासाहेब मोहिते यांनी ‘वीजवितरण कंपनी व ग्राहक’, जिल्हा ग्राहक मंचाचे माजी अध्यक्ष श्री.कमलाकांत कुबल यांनी ‘जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे कार्यप्रणाली’, संस्थेचे संघटक श्री.सर्जेराव जाधव यांनी ‘शेतकरी ग्राहक व जमीन मोजणी’ व कोकण विभाग अध्यक्ष प्रा.श्री.एस.एन. पाटील यांनी ‘ग्राहक संरक्षण कायदा-२०१९’ या विषयावर मार्गदर्शन केले.
जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव श्री.नितीन वाळके, अँड.सौ.म्हापणकर यांनी उपस्थित राहून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
कार्यशाळेच्या तिसऱ्या चर्चासत्रामध्ये ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांच्या विविध शंका व प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात येऊन समाधानकारक शंका निरसन करण्यात आले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संस्था स्वामी विवेकानंद यांना अधिष्ठान मानून त्यांच्या ‘शिवभावे जीवसेवा’ या तत्त्वाने कार्य करते. भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते ग्राहकतीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी यांच्या तत्वप्रणालीने कार्य करणारी एकमेव संस्था आहे. कोरोनाच्या काळात संस्थेने ऑनलाईन कार्यक्रम घेऊन ग्राहकांचे हक्क आणि अधिकार समजून सांगण्याचे कार्य केले. ही संस्था ग्राहकाभिमुख कार्य करीत असून या संस्थेला ग्राहकांनी जोडले जावे, असे आवाहन राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी केले. शेवटी सर्व प्रतिनिधीना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या एकदिवसीय विभागीय ग्राहक प्रबोधन कार्यशाळेला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर, रत्नागिरी व मुंबई येथील ग्राहक चळवळीचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ.अपर्णा तांबे यांनी स्वागतगीत सादर केले. व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्परोप देऊन स्वागत व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ग्राहकतीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी व स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. कु.हर्षदा कुबल हिने ‘साधनाका पंथ कठीन है ! हे ग्राहकगीत सादर केले तर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.संजीवनी पाटील व सौ. श्रद्धा कदम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सीताराम उर्फ दादा कुडतरकर व संदेश तुळसणकर यांनी केले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कणकवली तालुका अध्यक्ष श्री.नामदेव जाधव व तालुका कार्यकारिणीने विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा