You are currently viewing विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याचा शेर्पे ग्रामपंचायतीमध्ये ठराव…

विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याचा शेर्पे ग्रामपंचायतीमध्ये ठराव…

गावातील प्रत्येक वाडीवार सभा घेऊन ग्रामस्थांमध्ये करण्यात आली जनजागृती…

कणकवली

तालुक्यातील शेर्पे या गावातील ग्रामस्थांनी समाजातील अनिष्ट अशा विधवा प्रथेला कायमची तिलांजली देवून विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव करण्यात आला. तत्‍पूर्वी प्रत्‍येक वाडीनिहाय सभा घेऊन विधवा प्रथांबाबत जनजागृती करण्यात आली.

शेर्पे गावच्या सरपंच निशा शेलार विधवा प्रथा बंद करण्यासाठी ग्रामस्थांच्या साहाय्याने जनजागृती सुरू केली होती. त्‍याला सर्व वाडीतील ग्रामस्थांकडूनही सकारात्‍मक प्रतिसाद मिळाला. त्‍यानंतर ग्रामसभा घेऊन त्‍याबाबतच्या ठरावाची प्रत शासनाला पाठवून देण्यात आली. शेर्पे ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून विविध सामाजिक राजकीय संघटनांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

“पतीच्या निधनानंतर अंत्यविधी समयी पत्नीचा कपाळावरील कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे असे प्रकार होता. तसेच सदर महिलेला विधवा म्हणून समाजातील धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही. हा त्या महिलेवर होणारा अत्याचार असून एक प्रकारचा सामाजिक बहिष्कार आहे. कायद्याने सगळ्या व्यक्तींना जगण्याचा समान अधिकार असताना अशा अनिष्ट प्रथांमुळे विधवा महिलेच्या व्यक्ती स्वतंत्र्यावर गदा येत आहे. त्यामुळे यापुढे आमच्या गावात तसेच देशात प्रत्येक विधवा महिलेला सन्मान जगता यावे या करिता विधवा अनिष्ट प्रथा बंदचा निर्णय घेण्यात आला.” असे शेर्पे सरपंच निशा शेलार म्हणाल्या.

शेर्पे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये घेण्यात आलेल्या या ठरावाला रहिमान महंमद रमदुल हे सूचक तर मधुकर सगुण शेलार हे अनुमोदन आहेत. ग्रामसेवक मोहन माने यांनी ठराव मंजूर प्रत गटविकास अधिकारी (उच्चस्तर)वर्ग – १ पंचायत समिती कणकवली यांना पाठविली आहे. शेर्पे गावातील जैनवाडी, राणेवाडी, बौद्धवाडी, तांबळवाडी, मुस्लिमवाडी, पाटीलवाडी, भटवाडी या सर्व वाड्यामध्ये सभा घेऊन तेथील नागरिकांमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती करण्यात आली. ग्रामस्थांचा सुद्धा या निर्णयाला भरभरून असा पाठिंबा मिळाला. या ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णयाचे गावातील महिलांच्या व पुरुषांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा