You are currently viewing महविकास आघाडीच्या नेत्यांकडून रॅली काढून बंद ठेवण्याचे आवाहन

महविकास आघाडीच्या नेत्यांकडून रॅली काढून बंद ठेवण्याचे आवाहन

उत्तरप्रदेशमधील घटनेचा केला निषेध

शहरात व्यापाऱ्यांचा बंदला अल्प प्रतिसाद

कणकवली
उत्तरप्रदेशमधील लखीमपुर-खेरी येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकर्‍यांच्या अंगावर गाडी घालून चिरडून मारले. याप्रकरणी केंद्र सरकारकडून कोणतीही कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्यावतीने शहरात निषेध रॅली काढत दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. काही ठिकाणी दुकानदारांना दुकाने बंद करण्यासही लावले. त्यावेळी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महाविकास आघाडीच्यावतीने महाराष्ट्र बंदच्या दिलेल्या हाकेला सोमवारी सकाळपासून कणकवलीत अल्प प्रतिसाद दिसून येत होता. त्यानंतर महाविकास आघाडीच्यावतीने आमदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कार्यालय मुख्य चौक ते पुन्हा शिवसेना कार्यालय अशी ही रॅली काढत दुकानदारांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना महिला आघाडीच्या नीलम सावंत, राष्ट्रवादीचे नगरसेवक अबिद नाईक, राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस महींद्र सावंत, तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, हर्षद गावडे, राजू शेट्ये, राजू राठोड, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, भूषण परुळेकर, भास्कर राणे, निसार शेख, शेखर राणे, अनिल हळदीवे, विलास गुडेकर, बाबू सावंत, विनायक मेस्त्री व महा विकास आघाडीचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शिवसेना कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या रॅली नंतर बोलताना आमदार नाईक यांनी उत्तर प्रदेश मधील घटनेचा निषेध व्यक्त करत महाविकास आघाडीने आज पुकारलेल्या बंद मध्ये सर्व दुकानदाराने सहभागी व्हावे असे आवाहन केले. लखीमपूर येथील या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई न झाल्यास महाविकास आघाडीच्यावतीने यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही श्री नाईक यांनी दिला. शहरांमध्ये काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅली निघताच काही दुकानदारांनी स्वतःहून दुकाने बंद केली तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आवाहन करत दुकाने बंद करण्यास लावली.

या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 2 =