You are currently viewing ऑनलाइन गंडा घालणाऱ्यांचा कट सिंधुदुर्ग सायबर सेलने अवघ्या २४ तासात उधळला…

ऑनलाइन गंडा घालणाऱ्यांचा कट सिंधुदुर्ग सायबर सेलने अवघ्या २४ तासात उधळला…

७८ हजारांच्या फसवणूकीचा छडा; ४० हजार रक्कम परत, उर्वरित ३८ हजार बँकेने केले “होल्ड”…

सिंधुदुर्गनगरी

ऑनलाइन गंडा घालणाऱ्यांचा कट सिंधुदुर्ग सायबर सेलने अवघ्या चोवीस तासात उधळून टाकला. लक्ष्मण वसंत परब (५३) रा. वेंगुर्ले-खवणे यांची तब्बल ७८ हजाराला ऑनलाइन फसवणूक झाली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तपास करत सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी सद्यस्थितीत ४० हजार रक्कम संबंधिताला परत मिळवून दिली आहे. तर उर्वरित ३८ हजार रुपये रक्कम संबंधित बँकेमध्ये होल्ड केली असून ती दोन-तीन दिवसात परत मिळणार आहे. दरम्यान आपली रक्कम सुस्थितीत परत मिळाल्याने श्री.परब यांनी सायबर सेलच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्री. परब यांना अज्ञात मोबाईलधारकाने तुम्हाला ५००० रुपयांचा बोनस लागलेला आहे. तो घेण्याकरिता गुगल पे वर जावून पे वर क्लीक करा, असे सांगुन तक्रारदार यांच्या एका बँक खात्यामधून तब्बल ७८ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. संबंधित घटनेबाबत निवती पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक श्री. पगडे व बँक अधिकारी यांचेकडून तक्रारदार यांच्या फसवणूकीच्या व्यवहाराची माहिती घेवून सिंधुदुर्ग सायबर सेलने आरोपीचा कोलडी, झारखंड येथील ठावठिकाणा काढत आरोपीने केलेले सर्व फ्रॉड व्यवहार ब्लॉक करत तक्रारदाराला एकूण रक्कमेपैकी ४० हजार रक्कम २४ तासांचे आत परत मिळवून दिले, तसेच उवर्रीत ३८,००० रुपये संबंधित बँकेमध्ये होल्ड केलेले असून ते २-३ दिवसात परत मिळणार असल्याबाबत सांगितले आहे.

या गुन्ह्यांचा तांत्रिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राजेंद्र दाभाडे व अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल तोरस्कर , महिला पोलीस कॉन्स्टेबल धनश्री परब, तसेच निवती पोलीस ठाणे अधिकारी श्री.पगडे यांनी केला. तसेच आपला ओटीपी, एटीएम पीन, सीव्हीव्ही कोणासही शेअर करू नये, असे आवाहनही सिंधुदुर्ग सायबर सेलच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा