You are currently viewing प्रशाकीय अनास्थेमुळेच जिल्ह्यात तेजीत चाललेला पर्यटन व्यवसाय उद्धवस्त; याच मानसिकतेमुळे स्थानिक भूमिपुत्र अनधिकृत जलक्रीडा व्यवसाय करण्यास मजबूर : श्री विष्णू मोंडकर

प्रशाकीय अनास्थेमुळेच जिल्ह्यात तेजीत चाललेला पर्यटन व्यवसाय उद्धवस्त; याच मानसिकतेमुळे स्थानिक भूमिपुत्र अनधिकृत जलक्रीडा व्यवसाय करण्यास मजबूर : श्री विष्णू मोंडकर

मालवण :

जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय हा पूर्ण पणे सागरी पर्यटन जलक्रीडा व साहसी पर्यटनावर अवलंबून आहे. दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय उभारी घेत असताना 24 मे रोजी घडलेल्या बोट दुर्घटनेच्या घटनेचा आधार घेत जिल्ह्यातील सागरी पर्यटन पूर्ण पणे बंद ठेवण्याचा घाट स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. त्याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या पर्यटनावर होऊन जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय पूर्ण पण ठप्प झाला आहे. प्रशासनाने जलपर्यटन बंद करून पर्यटन व्यावसायिकांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. अश्या प्रशासकीय अनास्थेमुळे स्थानिक भूमिपुत्रच्या माध्यमातून अनधिकृत व्यवसाय होतो.

वास्तवीक जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना चांगली सेवा देण्यासाठी स्थानिक व्यावसायिक व प्रशासन यांची संयुक्तिक सभा होऊन जलपर्यटन चालू ठेवण्यासाठी काम होणे गरजेचे होते. इथल्या स्थानिक व्यावसायिकास या दिवसात व्यवसाय न मिळाल्यास येणाऱ्या दिवाळी पर्यंत पर्यकांची वाट पाहावी लागणार आहे. वास्तविक पाहता दर वर्षी 25 मे पावसाळी वातावरण गृहीत धरून शासनाच्या धोरणाप्रमाणे जलक्रीडा प्रकल्प बंद ठेवण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त होतात. परंतु स्थानिक किल्ला वाहतूक तसेच बॅकवॉटर ला समुद्र वातावरणाचां अंदाज घेऊन एक एक दिवसाची मुदतवाढ दिली जाते.

गेले 20 वर्षे अशा प्रकारे परवानगी मिळते. या वाढीव 10 ते 15 दिवसाच्या पर्यटन हंगामावर जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांबरोबर, मासेमारी व शेतकरी व्यावसायिकांना देखील फायदा होतो. शेवटच्या पर्यटन हंगामामुळे मच्छिमारांना मासेविक्रीतून जास्त नफा मिळतो तसेच आंबे, करवंद, जांभूळ, फणस यांच्या पर्यटकांनि केलेल्या थेट खरेदीतून जास्त नफा शेतकरी वर्गास मिळत असतो.

गेले दोन वर्ष कोरोनामुळे उद्धवस्त झालेला व्यावसायिक, स्थानिक प्रशासनाचे घरपट्टी, व्यावसायिक कर, व्यावसायिक दराने लाईटबील, बँक हप्ते अन्य खर्चातून मेटाकुटीला आला असून या उर्वरित पर्यटन हंगामातून होणाऱ्या नफ्यातून गेल्या दोन वर्षात झालेल्या कर्जातून मुक्त होण्याची आशा जिल्ह्यातील व्यावसायिकांस होती. ती प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे उद्धवस्त झाली आहे.

पर्यटनासाठी जिल्ह्यात आलेल्या पर्यटकांनी सागरी पर्यटनासाठी तसेच जलक्रीडेसाठी गोवा येथे जाण्यास पसंती दाखवली असून जिल्ह्यातील पर्यटक आपली बुकींग रद्द करून गोवा राज्यात जाऊन जलपर्यटन करत आहेत. स्थानिक जिल्हाधिकारी तसेच महाविकास आघाडीच्या पालकमंत्रानी तसेच नेत्यांनी या विषयी त्वरित लक्ष देऊन बंद पडलेले जलपर्यटन पावसाळी हंगामा पर्यंत चालू करावे, अशी विनंती श्री विष्णू मोंडकर जिल्हाध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी स्थानिक प्रशासनास तसेच राज्य सरकारला केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा