You are currently viewing कोटकामते येथील स्वप्नगंधा कंपनीच्या चुकीने जळलेल्या हापूस बागायतीच्या मालकांना न्याय मिळवून देणार – राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर

कोटकामते येथील स्वप्नगंधा कंपनीच्या चुकीने जळलेल्या हापूस बागायतीच्या मालकांना न्याय मिळवून देणार – राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर

कणकवली –

देवगड येथे महावितरणच्या विद्युत वाहिनीचे काम करत असताना चार वर्षापूर्वी स्वप्नगंधा कंपनीकडून कोटकामते येथील बागायतीला आग लागली होती. आज या पिडीत बागायतदारांची राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी भेट घेतली. सर्व पिडीत बागायतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी अनंत पिळणकर यांनी सांगितले. तसेच महावितरणच्या संबधित अधिकारी व कार्यकारी अभियंत्यांनी या प्रकरणात ठेकेदारावर कारवाई न केल्यास या अधिकाऱ्यांच्या तक्रार दाखल करून त्यांना या जिल्ह्यात फिरण्यास मज्जाव करू अशीही भूमिका  पिळणकर यांनी यावेळी मांडली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महावितरणचे काम संशयास्पद आहे. कमी दर्जाच्या वायरचा वापर तसेच लोकांना स्थानिक जमीन मालकांना विश्वासात न घेता पोल टाकणे अशी कामे चालू आहेत. जिल्हयात स्वप्नगंधा व कमलादेवी अशा दोनच कंपनीना वारंवार ठेका दिला जातो. सदर कंपनीच्या बऱ्याचशा तक्रारी आहेत. यापैकी स्वप्नगंधा कंपनीचे देवगड येथे काम सुरु होते. यावेळी कोटकामते येथे काम करत असताना या कंपनीच्या ठेकेदाराच्या चुकीमुळे ८ बागायतदारांच्या हापूस बागेला आग लागली होती. या आगीत सुमारे १ कोटीचे नुकसान झाले होते,  असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या हा विषय न्यायप्रविष्ट आहे. गेली ४ वर्ष हे सर्व गरीब बागायतदार न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत,  असे असताना संबधित अधिकारी दुर्लक्ष करत असून या ठेकेदाराला पाठीशी  घालण्याचा प्रयत्न  करत आहेत.

या आगीत कोटकामते येथील नामदेव गोपाळ मसुरकर, रवींद्र माधव खाजनवाडकर, वसंत भीमसेन मसुरकर, वासुदेव दत्ताराम मसुरकर, कल्याणी विठ्ठल मसुरकर, विष्णू भीमसेन मसुरकर, योगेश यशवंत लोके, अशोक गणपत वाळके या बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. यापैकी आज रवींद्र माधव खाजनवाडकर यांची अनंत पिळणकर यांनी भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी इतर बागायतदारांची व्यथा समजून घेतली.

यावेळी अनंत पिळणकर यांनी या बागायतदार शेतकऱ्यांना एकत्रित आणून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून मदत करण्याचे व संबधित ठेकेदार व अधिकारी वर्ग यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. याबाबत लवकरच जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या बागायतदारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, देवेद्र पिळणकर, गौरेश परकर, दिनेश राणे आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 3 =