You are currently viewing सद्ध्या वाढत असलेली महागाई …आणि आजूबाजूच्या देशात सुरू असलेली आर्थिक मंदी

सद्ध्या वाढत असलेली महागाई …आणि आजूबाजूच्या देशात सुरू असलेली आर्थिक मंदी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच….लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा लेख*

*सद्ध्या वाढत असलेली महागाई …आणि आजूबाजूच्या देशात सुरू असलेली आर्थिक मंदी…*

सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर…जगण्यावर..जीवनमानावर सर्वाधिक परिणाम करणारा गहन विषय म्हणजे “महागाई”…!
सर्वसामान्य म्हणण्याचा माझा खास उद्देश म्हणजे सर्वसामान्य… मध्यमवर्गीय लोक वगळता इतरांना महागाईचा फारसा फरक पडतच नाही…दारिद्र्य रेषेखालील जनता सरकारच्या मोफत धान्य…सुविधा आणि वेळप्रसंगी सर्वसामान्य लोकांकडे मागून खाऊन जगू शकते…श्रीमंत….गर्भश्रीमंत यांचा पैसा कुठे ठेवायचा हाच प्रश्न असतो…
त्यांना सरकारचा टॅक्स वाचविण्यासाठी एक संधीही असू शकते महागाई…परंतु यात भरडली जाते ती ना अध्ये ना मध्ये अशी असलेली मध्यमवर्गीय सर्वसामान्य जनता…!
सहज जरी मंडईत फेरफटका मारला तरी सर्वसामान्य कुटुंबातील स्त्रिया आपापसात बोलताना दिसतात…”काय बाई भाज्यांचे भाव वाढलेत…१०० रुपयात तर एक वेळची भाजी सुद्धा येत नाही…डाळी तर खायलाच नकोत…फोडणी द्यायची म्हटलं तरी तेल टाकताना विचार करावा लागतो…मोहरीपेक्षा तेल कमीच पडतं हल्ली….चिकन, मासे तर खायलाच नकोत…भर उन्हाळ्यात अंडी सुद्धा चढ्या दराने विकतात…कुठे ठेवणार आहेत पैसा काय माहिती…आपल्यासारख्या माणसाला भविष्यात जगायलाच नको”.
खरंच… मध्यमवर्गीय म्हटल्यावर मागायची सुद्धा लाज…आणि नाही आहे असं म्हणायची सुद्धा लाजच…!
एकीकडे जुन्या सत्ता खालसा करत देशातील जनतेला स्वप्नांच्या दुनियेत नेत वाढती महागाई कमी करणार, पेट्रोल, डिझेल, गॅस स्वस्त होणार वगैर… वगैरे आश्वासने देत सत्तेवर आलेले नवे सत्ताधीकारी… आणि लोकांच्या स्वप्नांची झालेली राखरांगोळी… दोन्ही निरशाजनकच…!
ते गेले….नवे आले म्हणत खुशीत गाजर खात असताना ..अवकाशाला टेकलेले पेट्रोल, डिझेल, गॅस आदींचे दर आणि परिणामी वाहतूक व्यवस्थेवर आलेला ताण लक्षात घेता…वाढलेले भाजीपाला, कडधान्ये, डाळी, तांदूळ आदी सर्व खाण्याच्या वस्तूंचे दर यामुळे सर्वसामान्य लोकांचे कंबरडेच मोडले आहे. सहावा, सातवा असे आयोगावर आयोग आले…सरकारी पगारवाढ झाली, परंतु रोजंदारी…खाजगी संस्था, कार्यालये, कंपनी, आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना मात्र वाढत्या महागाईला तोंड देताना नाकी नऊ येऊ लागलेत…वाढते कच्च्या मालांचे दर, लोखंड, सिमेंट, वाळू, आदी बांधकाम साहित्याच्या बेसुमार वाढलेल्या दरांमुळे बांधकाम क्षेत्रावर त्याचा थेट परिणाम झाला आणि सर्वाधिक रोजगार देणारं बांधकाम क्षेत्र अक्षरशः शेवटच्या घटका मोजत असताना दिसत आहेत. जीएसटी, आदी सरकारी टॅक्स त्यात आलेला रेरा कायदा यामुळे मोठे उद्योगपती वगळता छोटे उद्योजक देशोधडीला लागले.
आखाती देशात तेलाचा दर वाढलेला असताना स्वस्त असलेलं भारतातील तेल आज आखाती देशातील दरांच्या मानाने देशात अतिशय महाग झाले आहे. खाद्यतेल तर सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे. मिरचीने लागलेली भगभग कांदा टोमॅटो खाऊन कमी करायची म्हटलं तरी आज कांदा डोळ्यांतून आसवांचे लोट वाहवतो आहे तर…टोमॅटोचा दर पाहून टोमॅटोपेक्षाही सर्वसामान्यांचे डोळे लाल होत आहेत….टोमॅटो घालून डाळ, भाजीला आंबट चव येता येता टोमॅटो विकत घेणाऱ्यांची तोंडे टोमॅटोपेक्षाही आंबट होत आहेत.
पूर्वी भारतात तीन ऋतू अगदी वेळेवर सुरू व्हायचे… ग्लोबल वॉर्मिंग म्हणा अथवा इतर काहीही कारणांनी गेल्या काही वर्षात कधी वाढलेलं तापमान, कधी कडाक्याची थंडी तर वेळी अवेळी कधीही कोसळणारा पाऊस…असे ऋतुमान बदलत चालले आहे, त्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. आज शंभरीवर पोचलेले टोमॅटो कधी शेतकरी दर नाही म्हणून रस्त्यात फेकतात, शेतावरून नांगर फिरवतात… वातावरणाच्या लहरीपणामुळे शेती मालाचे दर गगनाला भिडतात. शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये असलेले दलाल, आडते, विक्रेते यांच्या भरमसाट कमिशनमुळे देखील महागाई वाढत चालली आहे. देशाचा शेअर बाजार तर सिमेंटच्या इमारतींसारखा वाढत जातो…देश विदेशातील धनाढ्य लोक पैशांच्या जोरावर बाजाराची दिशा बदलतात आणि सर्वसामान्य आपली तुटपुंजी रक्कम गुंतवून पत्त्याच्या इमारती सारख्या कोसळणाऱ्या शेअर बाजारात डुबून मरतात.
रशिया युक्रेन युद्धाचाही परिणाम देशांतर्गत महागाईवर दिसत आहे. लोखंड, तेल आदी मालांचे वाढलेले दर त्याचेच धोतक आहे. श्रीलंकेतील सत्ताधाऱ्यांनी आपली मालमत्ता वाढवली आणि आपल्या लहरीपणामुळे देशाला आर्थिक संकटात ढकलून देत पळ काढला. अवघ्या २.२ कोटी लोकसंख्येचा हा देश अभूतपूर्व आर्थिक विवंचनेत सापडला आहे. अन्नधान्य, गॅस, पेट्रोलचे दर गगनाला भिडले असून एटीएम रिकामी आहेत, पेट्रोलसाठी तसेच जीवनावश्यक वस्तूंसाठी मोठमोठ्या रांगा लागतात, अनेकांवर उपासमारीची वेळ सुद्धा आली आहे. देशातील लोक भारतासारख्या देशात स्थलांतरित होत आहेत. कोरोना आणि रशिया युक्रेन युद्धामुळे अनेक देशांमध्ये महागाई वाढलेली आहे. पाश्चात्य देशातही महागाई वाढत आहे. पाकिस्तानची देखील आर्थिक स्थिती खालावली असून सत्ताबदल झाला तरी पेट्रोल डिझेलचे दर दुप्पट होण्याची चिन्हे आहेत, परिणामी पाकिस्तानातील जनतेच्या डोक्यावर देखील महागाईचा बॉम्ब फुटणार आहे. बांग्लादेशाची परिस्थिती काही याहून वेगळी नाहीच.
कोरोनाच्या काळात उत्पादनात झालेली घट आणि वाढती मागणी, नोकर कपात, घरातून काम आदी कारणांनी वाढलेली महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही. लोकांनी वाढत्या महागाईचा सामना करायचा असेल तर स्वतःच्या गरजा कमी करून बचत करण्याचा मार्ग अवलंबिला पाहिजे. महागाई वाढली म्हणून ओरड सुरू असतानाच देशाच्या प्रत्येक स्तरावरील नागरिकांकडून ऑनलाइन अनावश्यक महागडे मोबाईल, कपडे, आदी चैनीच्या वस्तू खरेदी सुरूच आहे. मोठमोठे मॉल आजही गजबजलेले दिसतात आणि रस्त्यावर भिक्षेकरी मात्र वाढलेले असतात, ही परिस्थिती बदलली पाहिजे. भारताच्या आजूबाजूच्या देशात सुरू असलेली आर्थिक मंदी पाहता भारत सरकारने आत्तापासूनच संकटाशी दोन हात करण्याची तयारी केली पाहिजे. देशात गरिबी स्तर वाढत असून देशातील आमदार खासदारांचे भत्ते, मानधन मात्र वाढविले जात आहे. शेजारच्या घरातील संकट आपल्या घरावर येऊ नये असे वाटत असेल तर सरकार आणि जनता सर्वांनीच आर्थिक घडी विस्कटू नये याकरिता प्रयत्न केला पाहिजे….

[दीपि]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − four =