You are currently viewing निसर्ग आणि माणुस

निसर्ग आणि माणुस

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच समूह प्रमुख ज्येष्ठ लेखक कवी पांडुरंग कुलकर्णी यांचा अप्रतिम लेख

माणूस निसर्गातच जन्माला येतो व निसर्गातच तो देहही ठेवतो. जन्म आणि मृत्युच्या या कालावधीमध्ये तो निसर्गातच वावरत असतो. इतका निसर्ग त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग होवून जातो. तो निसर्गात रमतो . निसर्गही त्यला भरभरून देतो. दोघेही एकमेकाचे अविभाज्य घटक बनून जातात. माणसावर निसर्गाचे इतके प्रचंड उपकार असतात की कृतज्ञतेच्या भावनेतून माणूस निसर्गाला देव मानतो व त्याचे पूजन ही करतो. निसर्गही माणसाला काही कमी पडू देत नाही. माणूस मालामाल होतो . आनंदी राहतो. निसर्गाचा नैसर्गिकता हा गुण तो घेतो व सुखी होतो .
स्वच्छ झऱ्याचे पाणी पिणे. तलावात, नदीत मनसोक्त डूम्बणे, धबधब्याखाली आनंद लुटणे, गाभूळल्या चिंचांचा आस्वाद घेणे, पोपटाने खाल्लेला पेरू मिटक्या मारीत खाणे, हुरडा पार्टीचा आनंद लुटणे, विहिरीतील अंघोळी, सूरपारंब्या, गाई गुरे राखणे, कुस्ती खेळणे, गाई म्हशीच्या धारा काढणे, नैसर्गिक खतावर पोसलेले नैसर्गिक अन्न खाणे, त्यमुळे रोग राई अजिबात जवळही येत नव्हती .शारीरिक व मानसिक स्थिती अत्युत्तम होती. शारीरिक व मानसिक आनंदाच्या डोही मनसोक्त जगत होता. कारण निसर्गाचा नैसर्गिकता हा गुण त्याचे ठायी होता. त्याचा त्याला अभिमान होता.
पण मग माणसाच्या इच्छा आकांक्षा वाढू लागल्या. त्याला कृत्रीमतेची बाधा होऊ लागली. कृत्रीमतेचे तोटे कळत असूनही त्याचा मोह त्याला कवेत घेवू लागला आणि तो निसर्गापासून दूर दूर जावू लागला. त्याला नदीत पोहणे गलिच्छ वाटू लागले. हुरडा खाणे रानटी वाटू लागले. रानमेवा खाणे अशीक्षित वाटू लागले. निसर्ग हा माझा देव आहे, आई आहे, हे तो हळू हळू विसरू लागला. भडक, स्वैराचारी जगणे त्यास आवडू लागले. स्वछन्दाची जागा स्वैराचाराने घेतली. नैसर्गीकतेची जागा कृत्रिमतेने घेतली .आता तो शेतीत हि नैसर्गिक खते न वापरता रासायनिक खते वापरू लागला. पिकाची संख्या व दिखावूपणा वाढला पण चव, स्वदिष्टता, पौष्ठीकता दूर पळाली. नैसर्गिकतेकडून कृत्रीमतेकडे वाटचाल सुरु झाली. झाडे तोडून फर्निचर बनवले जावू लागले. कॉंक्रिटची जंगले वाढू लागली. निसर्ग कोमेजू लागला. कोपुही लागला. मानवाच्या शारीरिक व मानसिकतेवर परिणाम करू लागल्या. अधोगती होते आहे हे कळत असूनही मोहापायी माणूस ते सर्व करीतच राहिला व अजूनही करतो आहे.
देवाची जागा दानवाने घेतली. ज्या धर्मस्थळावर प्रार्थना समुपदेशन, कथा कीर्तन, पूजा अर्चा व्हायच्या तिथेच दहशतवादाचे अड्डे बनू लागले. शिवाजीचे राजकारण नावालाही उरले नाही. राम रहीम आसाराम बनू लागले. न्यायाची जागा अन्यायाने घेतली. चंगळवाद वाढला. संस्कृती, संस्कार देहोधडीला लागले. अक्षरधामे रडू लागली , कुटुंब व्यवस्था कोसळू लागली. त्याग जावून उपभोग आला. प्रतिष्ठा जावून अनिष्ठता आली. आम्रतरूवर मोराऐवजी गिधाडे ऐटीत बसू लागली. अनिष्ठतेला प्रतिष्ठा लाभली. मंदिराची मादिरालये झाली. न्याय लपून दडून राहु लागला. अन्यायी लोक मात्र निधड्या छातीने चोहोकडे मिरवू लागले. अंधश्रद्धा उफाळू लागल्या. कृत्रिमता माणसाची मने व शरीरे कुरतडू लागली. असहाय माणूस व्यसनाच्या आहारी जावू लागला .हा सर्व अपघात एका अनैसर्गीकतेने केला.
माणसाची अवस्था कळतंय पण वळत नाही अशी झाली. वरून कीर्तन आतून तमाशा अशी गत झाली. कृतघ्नता शिगेला पोहोचली. चोर्यामार्या वाढू लागल्या. दरोडे दहशती नित्याच्या झाल्या. चोर शिरजोर झाले. कारण ते राजकारण्यांचे पिल्लावळ झाले. त्यांना राजकीय वरदहस्त लाभला. सामान्य माणूस पूर्ण चिरडला गेला. तो मातीमोल झाला. दारू दुकानासमोर रांगच रांग आणि मंदिरे ओस पडू लागली. कीर्तनास म्हातारे कोतारे पण बार मात्र ओसंडून वाहू लागले. युवा पिढी घसरू लागली. प्रबोधनाची गरज भासू लागली.
हि प्रबोधनाची जबाबदारी आता कोणी घ्यायची ? साहित्यिक, लेखक, कवी, विचारवंत, नाटककार, अभिनेते, व्याख्याते, कीर्तनकार, भजनी मंडळी, गायक, संगीतकार इत्यादी लोग हि जबाबदारी घेवू शकतात. कार्य फार मोठे आहे पण अतिशय गरजेचे आहे. प्रबोधनच यातून मानवतेला तारेल, अन्यथा नष्टता ठरलेली आहे.
माणसाने विचार करायची वेळ आलेली आहे. झाले गेले विसरून जावू या. संमार्गाची कस धरू या. संत साहित्य वाचू या, समजून घेवू या. नैसर्गीकतेकडे परत वाटचाल सुरु करू या. वेळ लागेल, हरकत नाही पण ते अतिशय गरजेचे आहे. मानवतेच्या दृष्टकोनातून फारच महत्वाचे आहे. अन्यथा कोरोना सारखे रोग आपल्याला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाहीत. पाश्चाताप हा नेहमीच उशिरा होतो. जागा हो माणसा, जागा हो. रात्र वैऱ्याची आहे.

*लेखक….पांडुरंग कुलकर्णी नाशिक*

प्रतिक्रिया व्यक्त करा