गझल प्राविण्य परिवारातील गझल रसग्रहण उपक्रमात लेखिका कवयित्री सौ.शोभा वागळे यांच्या “तुला सांगते” गझलेच्या कवयित्री सुधा नरवाडकर यांनी केलेलं रसग्रहण
गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वेसर्वा आदरणीय प्रवीण पुजारी सर.
पिके, नंदिनीताई ,शोभा ताई ,असावरी ताई, आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना नमस्कार करून मी रसग्रहण करत आहे…..
परिवारातील आदरणीय गझल कारा म्हणजे सौ, शोभा ताई वागळे.. सदैव हसतमुख असणाऱ्या, मधुर वाणीच्या, सर्वांशी गोड बोलणाऱ्या आणि सर्वांच्या लाडक्या भगिनी म्हणजे या शोभाताई््् यांची “”तुला सांगते “ही सौदामिनी वृत्तातील गझल वाचता क्षणीच माझ्या मनात ठसली..शहरी नटवेपणापेक्षा ग्रामीण भागातला साधेपणा.
जसा आकर्षित करतो तसे अत्यंत साध्या सोप्या शब्दांनी युक्त अशी रसाळ गझल मला अतिशय आवडली.
गझल वाचता क्षणीच एक रमणीय दृश्य माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले…
सनई चौघड्यांचा आणि बँडचा मनाला आनंदित करणारा आवाज, प्रवेशद्वारासमोर सुस्वागतमची भव्य रांगोळी,
अत्तराच्या फवाऱ्यांनी सुगंधित झालेले वातावरण, दुसऱ्यांच्या भरजरी साड्या कौतुकमिश्रितनजरेने बघणाऱ्या उत्साही स्त्रिया… भटजींची स्पीकरवरची मोठ्या आवाजातली मंगलाष्टके, आणि वधूवरांची एकमेकांकडे बघण्याची उत्सुकता.!! सारेच कसे मोहक . आणि त्याच वेळी मंडपामध्ये उत्साहाने मिरवणारी आणि अधून मधून डोळे टिपणारी ती वधू माय….!!! सारेच झण भारावून टाकणारे.!!
त्या अश्रूत वधू माय मुलीला संस्काराचा कलशच जणू देत होती…. ती मुलीला दिलेली शिदोरी म्हणजे शोभाताईची आजची ही गझल आहे.
*तुला सांगते*
स्वतःला जपावे तुला सांगते
सुखाने जगावे तुला सांगते
नको वेदनाना मनाशी धरू
मनाने हसावे तुला सांगते
जरी मार्ग अवघड दिसावा तुला
दमानेच घ्यावे तुला सांगते
सदा सत्यवाचा असावी तुझी
जगाने बघावे तुला सांगते
स्वतःच्या सुखाला नको पाहणे
जगाला सुखावे तुला सांगते.
शोभा वागळे
मुंबई.
8850466717
*(१) स्वतःला जपावे तुला सांगते*
*सुखाने जगावे तुला सांगते*..
एका अंगणातली जाई दुसऱ्या अंगणात पाठवताना कोणाचेही मन कातर होते. काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हाती सोपवताना घालमेल होते. म्हणून काळजी ने लेकीला सतर्क राहण्यास ही प्रेमळ आई सांगते..
तिथले सगळेच वातावरण रीतिरिवाज भिन्न आहेत.. माणसे अनोळखी आहेत.. तेव्हा स्वतः जपावे.. तुझे दुसरे आयुष्य सुरु होत आहे.. क्षणाक्षणाला तुला स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे.. कुणाला दुखवायचे पण नाही आणि स्वतःच्या स्वाभिमानाला पण ठेच लागू द्यायची नाही.इतरांची मने जिंकायची आहेत.. स्वतः पण सुखाने जगायचे आहे …!!! शोभाताई खूप छान …मोजक्या शब्दात स्त्रीजीवन बद्दलाची जाणीव तुम्ही करून दिली आहे….!!!!
*२)नको वेदनांना मनाशी धरू..*
*मनाने हसावे तुला सांगते*..
अनोळख्या घरी वावरताना कळत नकळत काही चुका होणारच.. मग कोणीतरी खवचटपणे बोलणार.. तुला ते कदाचित सहन होणार नाही .पण जीवन जगताना असे प्रसंग येणारच ..पण तेच तेच विचार मनाशी कुरवाळत बसू नकोस ..तसे केलेस तर वर्तमान खराब होतो ..मनाने सूप बनावे फोलकटे झटकून टाकावी सत्व जवळ बाळगावे.सदा आनंदी रहावे. हसत रहावे. तुमची दुःख भरी कहाणी कुणालाच नको असते…!! *सर्वांनाच मार्गदर्शक असा हा दर्जेदार शेर आहे गझलकारा ताईंचा!!…
*३) जरी मार्ग अवघड दिसावा तुला*..
*दमाने घ्यावे तुला सांगते*..
हा शेर सर्वांनाच चपखलपणे लागू पडणारा आहे.सासरी नांदणारी मुलगी असो.. शिक्षणासाठी बाहेर पडलेली युवती असो…
एखादे उच्च ध्येय साध्यकरणारी ध्येयवेडी माणसे असोत… ध्येय साध्य करण्यासाठी ध्येयापर्यंत पोहचण्याचा मार्ग खूप अडचणींचा ,संकटांचा अडथळ्यांचा असतो…. वाटचाल करताना दमछाक होते. बिकट वाट बघून कधीकधी ध्येय अर्धवट सोडण्याचे विचारही मनात येतात… पण छे!छे!अशा मार्गाला जायचेच नाही. एकदा कार्यात उडी घेतली मग घाव कमी बसोत की जादा बसोत.. चिंता करायची नाही..
धीर सोडू नको..कारण.. धीर धरी रे धीरा पोटी असती मोठी फळे गोमटी हे लक्षात असू द्यावे…
अशाने शंभर टक्के यश खात्रीने मिळते.. असा आशावाद या शेरातून ताईंनी दिलेला आहे
किती थोड्या शब्दातून महान अर्थ व्यक्त करणारा हा शेर आहे..
*४) सदा सत्य वाचा असावी तुझी*..
*जगाने बघावे तुला सांगते*..
समाजात वावरताना” खऱ्याचे खोटे आणि लबाडाचे तोंड मोठे” असे चित्र वारंवार आपल्या प्रत्ययास आले तरी शेवटी सत्याला मरण नसते हे कायम लक्षात ठेवावे..
‘सत्यमेव जयते’ हे आपले ब्रीदवाक्य आहे.. क्षणिक सुखासाठी खोट्याचा आधार घेतला तर मग खोटयाचीच एक साखळी तयार होते आणि मनःशांती आपण गमावून बसतो.
झोप नाही, मनाला स्वस्थता नाही ..मग हे सारे कशासाठी..???
तेव्हा जीवनभर सत्याचाच पाठपुरावा करावा कारण सत्य हेच शिव आहे आणि शिव हेच सुंदर असते.
पुत्र कन्या व्हावी ऐसी गुणी. ज्यांची तिन्ही लोकी वाखाणणी .!!….
जीवनातील अनमोल असे मूल्य गझलकारा सहजपणे सांगून जातात…
*५) स्वतःच्या सुखाला नको पाहणे*..
*जगाला सुखावे तुला सांगते*..
लेकीने ,अथवा प्रत्येकाने सुखी रहावे ,आनंदात जगावे, असे गझलकारा म्हणतात पण तितकेच जीवन मर्यादित नसते तर व्यापक होणे आवश्यक आहे. असेही त्यांचे म्हणणे आहे. कधी कधी मनुष्य स्वतःच्या सुख दुःखात इतका गुंग होतो की ना कुटुंबाचे,ना समाजाचे ,ना देशाचे त्याला कशाचेच भान उरत नाही .. मला अशा माणसांबद्दल प्रश्न पडतो* तुझ्यात आणि पशूमध्ये फरक तो कोणता…???हेच गझलकारा इथे सुचवतात…
माणूस म्हणून जन्माला आलो आहोत तर माणूस म्हणूनच जगले पाहिजे. नराचा वानर होता नराचा नारायण कसा होईल याची तयारी हवी. इथे मी एका आईचे उदाहरण देते.. तिने फक्त स्वतःच्या दोन मुलांचीच आई व्हावे असे नाही तर आपले मातृत्व विशाल करावे आणि अनेक मुलांची तिने आई व्हावे…!!
दुसरे उदाहरण डोळे दिपवणारे आहे .स्वार्थी लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. ते आहे स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांचे. जन्मठेपेची शिक्षा भोगण्यापूर्वी त्यांची आणि त्यांच्या पत्नीची भेट झाली .त्या वेळचे ते शब्द अंगावर शहारे आणणारे आहेत आणि आजच्या पिढीला तर ते अत्यंत मार्गदर्शक आहेत..
ते म्हणाले……चार काटक्या गोळा करून चिमणा चिमणी देखील घरटे बांधतात पण *अनेकांच्या घरातून सोन्याचा धूर निघणारा असेल तर त्यासाठी एखादे घरटे मोडले तर कुठे बिघडले..????
तुझ्यासाठी मरण ते जनन
तुजविण जनन ते मरण””.
स्वतःच्या सुखाचा होम करून देशासाठी प्राणार्पण करणारे हे आहे एक आदर्श उदाहरण…!!!*
हेच ताईंनी सांगितले आहे..
धन्य धन्य आहात.. ताई
🙏🙏🙏
शेवटी एवढंच म्हणेन आशय संपन्न खायाल, तुला सांगते या
रदिफ मुळे आलेली लयबद्धता, प्रासादिक गुणांनी नटलेली,… अशी शोभा ताईंची ही गझल सर्वांनाच प्रेमात पाडणारी आहे .म्हणूनच ती मला अतिशय आवडली..
धन्यवाद…
🙏
सुधा नरवाडकर.