You are currently viewing माझा स्वभाव नाही

माझा स्वभाव नाही

*काव्यनिनाद…. शब्दशृंगार साहित्य मंच सदस्य लेखक कवी पंकजकुमार ठोंबरे यांची अप्रतिम गझल रचना*

वृत्त आनंदकंद

*माझा स्वभाव नाही*

खोट्यास वाकणारा माझा स्वभाव नाही
सत्यास त्यागणारा माझा स्वभाव नाही

घेऊन जा तुझे तू ताजे गुलाब सारे
प्रेमात भंगणारा माझा स्वभाव नाही

घनघोर वादळांशी आलो लढून येथे
युद्धात हारणारा माझा स्वभाव नाही

केलेत माफ सारे मोठे गुन्हे तुझे मी
सूडात पेटणारा माझा स्वभाव नाही

पोहून पार केले लाटेस सागराच्या
डबक्यात साचणारा माझा स्वभाव नाही

शत्रुत्व नष्ट केले केव्हाच मी तुझ्याशी
आजन्म भांडणारा माझा स्वभाव नाही

शब्दांस मानतो मी आयुष्य आज माझे
अर्थास छेडणारा माझा स्वभाव नाही

रानात झेलतो मी पाऊस आसवांचा
दु:खात संपणारा माझा स्वभाव नाही

पंकजकुमार उत्तम ठोंबरे
कोंडोली , ता. मानोरा
जि. वाशिम 444404
मोब. 9503717255

प्रतिक्रिया व्यक्त करा