You are currently viewing नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रस्त्यासाठीचे उपोषण स्थगित…

नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रस्त्यासाठीचे उपोषण स्थगित…

रस्ता खुला करण्याचे प्रयत्‍न सुरू; प्रांताधिकाऱ्यांची ग्‍वाही…

कणकवली

नांदगाव तिठा येथील सर्व्हीस रोडसाठी नांदगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी सुरू असलेले उपोषण स्थगित केले आहे. सर्व्हीस रोड खुला करण्याचे काम सुरू आहे. त्‍याअनुषंगाने तेथील बाधित जमीन मालक नलावडे यांना आजच लेखी पत्र देत आहोत. तसेच त्‍यांच्या जमिनीच्या वाढीव मोबदल्‍याचाही प्रस्ताव महामार्ग प्राधिकरणकडे पाठविला असल्‍याची माहिती प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली. यानंतर उपोषण मागे घेत असल्‍याचे नांदगाव पंचक्रोशीतील नागरिकांतून सांगण्यात आले.

नांदगांव पंचक्रोशीतील माजी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, सामजिक कार्यकर्ते भाई मोरजकर, असलदे सरपंच पंढरी वायगंणकर, ओटव उपसरपंच राजेश तांबे, विश्वनाथ जाधव,मारुती मोर्ये, नितेश म्हसकर, आशिये माजी सरपंच शंकर गुरव, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, ज्येष्ठ पत्रकार संतोष वायगंणकर, पत्रकार भगवान लोके, माजी सरपंच संजय पाटील, हनुमंत वाळके, कमलेश पाटील,संतोष पुजारे, आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. तसेच या उपोषणाला कॉग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, सरचिटणीस प्रवीण वरुनकर, भाजप तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, मनसे तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी व सर्व्हिस रस्त्याचा ज्वलंत प्रश्न असल्याने पत्रकारांनी या साखळी उपोषणाला पाठींबा दर्शवला.

नांदगांव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपोषणावेळी नांदगाव येथील सर्व्हिस रस्ता झालाच पाहिजे.., कोण म्हणतंय देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही, अशा घोषणा दिल्या. सकाळी १० वाजल्यापासून हे उपोषण सुरु करण्यात आले. दरम्यान, कणकवली प्रांत अधिकारी वैशाली राजमाने यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करत उपोषण मागे घ्यावे, असे सांगितले. त्यावर उपोषणकर्त्यांनी लेखी आश्वासन द्या अशी मागणी केली. अखेर प्रांताधिकार्‍यांनी उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन सर्विस रस्त्याबाबत दिल्यामुळे हे उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते भाई मोरजकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =