You are currently viewing कल्याण डोंबिवलीत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’   मोहिमेअंतर्गत आढळले सारी आजाराचे रुग्ण…

कल्याण डोंबिवलीत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत आढळले सारी आजाराचे रुग्ण…

 

कल्याण:  सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत आतापर्यत सारी आजाराचे ३३७१ रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांच्या तपासणी दरम्यान अनेक रुग्णांमध्ये कोरोनाचीही लक्षणे आढळून आली आहेत. तर दुसरीकडे शहरात उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनी विकार, अस्थमा, कॅन्सर, टीबी हृदयरोग यांसारखे गंभीर आजार असलेल्या रुग्णांची संख्या १८,०९२ गेली आहे. या रुग्णांना कोरोनाचा धोका जास्त असल्यामुळे त्यांना कोरोनाशी झगडावे लागत आहे.

 

महानगरपालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत सुमारे ८,००० घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व्हेत १० टक्के कोरोना रुग्ण सापडले आहेत. मात्र, परिसरात ताप, सर्दी, खोकला अस्थमा, दमा यासारखे आजाराची लक्षणे असलेले सारी आजाराचे ३३७१ रुग्ण सापडले असून यात ३० टक्के रुग्णांना कोरोनाचीही लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. लागण झाल्यानंतर याची माहिती वेळेत मिळाल्याने या रुग्णांना उपचारासाठी दाखल करणे सोपे झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

 

शहरातील कोरोना रुग्णांचा दररोजचा आकडा ४००च्या जवळपास स्थिरावला आहे. सप्टेंबर महिन्यात कल्याणातील एका रुग्णालयात डायलिसीसचे उपचार घेणाऱ्या ९० पैकी १६ रुग्णांना जीव गमवावा लागल्याने अशा रुग्णांना असलेला धोका प्रकर्षाने समोर आला आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनी विकार, अस्थमा, कॅन्सर, टीबी, हृदयरोग यासारखे गंभीर आजार असल्यामुळे प्रतिकार शक्ती कमी झालेल्या रुग्णाची अधिकृत संख्या १८ हजार ९२ असून या रुग्णांची विशेष काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

 

कल्याण डोंबिवलीची लोकसंख्या १६ लाख असून आतापर्यंत केवळ १ लाख ४० हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी तब्बल ४४ हजार रुग्णांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =