You are currently viewing देवबाग ग्रामस्थांनीच वैभव नाईकांना जाब विचारावा – भाजप प्रदेश सचिव निलेश राणे

देवबाग ग्रामस्थांनीच वैभव नाईकांना जाब विचारावा – भाजप प्रदेश सचिव निलेश राणे

सिंधुदुर्गच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ; परिवर्तनात सहभागी होण्याचे निलेश राणेंचे आवाहन

 

मालवण :

देवबाग बंधाऱ्यासाठी राणेसाहेबानी १ कोटीचा खासदार निधी जाहीर केल्यावरच आमदार वैभव नाईक यांचे ४ कोटी रुपये उभे कसे झाले ? असा सवाल भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणेंनी उपस्थित केला आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनीच वैभव नाईकांना जाब विचारावा, असे सांगून वैभव नाईक हा छोट्या मनाचा आमदार असल्याची टीका त्यांनी केली. देवबाग मध्ये आयोजित भाजपाच्या सभेत ते बोलत होते.

यावेळी निलेश राणे म्हणाले, प्रत्येक पावसाळ्यात देवबागची काय अवस्था असते, ती मी डोळ्यांनी बघितली आहे. राणेसाहेबानी १ कोटींचा खासदार निधी जाहीर केल्यावर सर्वात जास्त गरज कुठे आहे ते पाहून आम्ही बंधाऱ्याच्या नुतनीकरणाचे काम हाती घेतले. साहेबानी एक कोटींचा निधी जाहीर केला, तेव्हा काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे गेलो. त्यांनी अवघ्या ३० सेकंदात खासदार निधीला मान्यता दिली. त्यांच्यावरही कुठला तरी दबाव होता, पण आम्ही जेव्हा येथील लोकांची वस्तुस्थिती सांगितली, त्यांनी परिस्थिती ओळखली. जिल्हाधिकारी मॅडम तीन वर्षे जिल्ह्यात आहेत, पण आमदार ८ वर्ष इकडे आहे. त्याला देवबागचा बंधारा दिसला नाही.

जेव्हा राणे साहेबानी एक कोटी रुपये दुरुस्ती साठी दिले, त्याच्या नंतर आमदाराने ठेकेदाराला जन्म दिला. आणि धावत पळत देवबागला भूमिपूजन झालं. तसंच तोंडवळीलाही झालं. एवढ्या छोट्या मनाचा माणूस महाराष्ट्रात कुठेच आमदार नसेल. तळाशीलला मागील पावसाळ्यात आम्ही खिशातून ३ लाख ७० हजार रुपये गावाच्या मंदिरात दिल्याची आठवण करून देतानाच वैभव नाईक यांनी तळाशीलमध्ये साडेचार कोटी तर देवबाग मध्ये चार कोटीच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन केले आहे. जोपर्यंत कॉन्ट्रॅक्टर १० % देत नाही, तोपर्यंत काम करायला द्यायचं नाही, असं त्यांनी ठरवलं होतं. रत्नागिरीच्या पालकमंत्र्याच्या भावाला वेगळं कमिशन आणी इकडे वेगळं. दोघांचं झालं की काम सुरू करा, ही अट जेव्हा कॉन्ट्रॅक्टरने ऐकली तेव्हा त्याने काम करायला नकार दिला. पण जेव्हा कळलं निलेश राणे इकडे आला, साहेबानी पैसे दिले, तेव्हा झक मारून त्याला भूमिपूजन करावं लागलं, असं निलेश राणे म्हणाले. एवढ्या छोट्या मनाचा आमदार सिंधुदुर्ग जिल्ह्यात कधी झाला नसेल आणि कधी होणार नाही.

फक्त भूमिपूजन करून परिस्थिती बदलणार नाही. ३ वर्षांपूर्वी जी भूमिपूजन झाली होती, तीच भूमिपूजन आज होतायत. एकही नवीन भूमिपूजन झालेलं नाही. २५/१५ ची कामं जी कोरोनाच्या अगोदर झाली, त्याची भूमिपूजने आता पुन्हा आमदार करतोय. या आमदाराकडून कोणतीही अपेक्षा ठेऊ नका. ग्रामीण भागात फक्त फलक लागले, त्यापुढे काही झालं नाही. १ कोटी रुपये जेव्हा राणेंनी जाहीर केले, तेव्हा ४ कोटी कसे उभे राहिले, हा प्रश्न त्याला विचारा. आपल्याला राग आला पाहिजे, चीड आली पाहिजे. आठ वर्षे हा मतदार संघ भोगतोय. फक्त सरकारी पैसे कधीतरी येतील, कुठेतरी बंधारे होतील, त्या पलीकडे हा मतदार संघ गेलाच नाही, असे निलेश राणे म्हणाले. आज परिस्थिती बदलतेय. केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, त्यामुळे या परिवर्तनात सहभागी होण्याचे आवाहन निलेश राणेंनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =