You are currently viewing पावसाचा अडथळा असूनही आजगाव येथील साहित्य कट्ट्याची एकोणीसावी सभा थाटात संपन्न

पावसाचा अडथळा असूनही आजगाव येथील साहित्य कट्ट्याची एकोणीसावी सभा थाटात संपन्न

माझं वाचन हेच माझं जीवन : प्रमुख अतिथी माधुरी आठल्ये

“बालपणापासून जोपासलेला पुस्तक वाचनाचा छंद आणि नोकरीला लागल्यावर त्याला दिलेली पुस्तक संग्रह करण्याची जोड आजही अव्याहतपणे सुरू आहे. अजून दहा वर्षे हे करण्याची इच्छा असून नंतर जीवापाड जपलेली ही पुस्तकं चांगल्या संस्थेला भेट देईन. मूळात ‘माझं वाचन हेच माझं जीवन’ असून त्यासाठी मला कधी कोणतीही तडजोड करावी लागली नाही. माहेरी लावलेलं हे पुस्तक वाचनाचं रोपटं सासरीही चांगलं बहरलं.” आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्यावर प्रमुख अतिथी माधुरी आठल्ये बोलत होत्या. निमित्त होते कट्ट्याच्या एकोणीसाव्या सभेचे.
सुरुवातीला विनय सौदागर यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचा परिचय करून दिला. त्यानंतर कट्ट्याचे ज्येष्ठ सदस्य विनय फाटक यांचे हस्ते श्रीफळ व पुस्तक भेट देऊन सौ. आठल्ये यांचा उचित सन्मान करण्यात आला. सौ.आठल्ये पुढे म्हणाल्या,”प्राथमिक शाळेतील शिक्षकानी मला पुस्तक वाचनाची गोडी लावली. नंतर माझे काका अत्रेभक्त अनंत काकतकर यांनी परिसरातील वाचनालयात माझे नाव नोंदवून त्याला बळ दिले. लग्नानंतर विस्कळीत झालेले वाचन पुन्हा त्यांच्याच प्रेरणेने सुरू झाले. या वेळी पुस्तक खरेदीची त्याला जोड दिली गेली. पुस्तक विकत घेतल्याने ते पुन्हा पुन्हा चवीने वाचता येते. ”
‘भेटवस्तू देताना नेहमी पुस्तक द्यावे. मुलांना खाऊ किंवा खेळणी द्यायच्या अगोदर पुस्तक वाचण्याची लटकी सक्ती करावी. डाॅक्टरांच्या क्लिनिक मध्ये लहान मुलांसाठी आकर्षक पुस्तके,लहान मुलांसाठीची मासिके असावीत’, असेही त्यांनी सुचवले.
नंतर झालेल्या चर्चेत महेश बोवलेकर, सोमा गावडे,सूर्यकांत आडारकर, विनायक उमर्ये आदीनी भाग घेतला. वाचनात अनुवादित पुस्तकांचे महत्त्व काय?,आपल्या संग्रहात आध्यात्मिक पुस्तकांचे स्थान काय?,पुस्तकात रमल्याने आपल्याला समाजापासून दूर जाण्याचा धोका वाटत नाही काय?,आपली अत्यंत जवळची पुस्तके कोणती? असे अनेक प्रश्न त्याना विचारण्यात आले. त्यांची त्यानी समर्पक उत्तरे दिली.
सभेला आशा जोशी, सुमन मुंडले, प्रसन्ना साधले, शुभम् साधले, अंकिता वाडकर, कवी विशाल उगवेकर, एकनाथ शेटकर, मीरा आपटे आणि अनिता सौदागर असे साहित्य प्रेमी उपस्थित होते.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनय सौदागर यानी केले.आजगाव वाचनालयात पार पडलेल्या यासभेस पाऊस असूनही साहित्यप्रेमींची उपस्थिती लक्षणीय होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा