(वाचकांना एक हात जोडून नम्र विनंती मी ही पोस्ट तटस्थपणे लिहीलीयं, आपणही ती तटस्थ नजरेतुनच वाचावी.)
मी नाही उजवा, नाही डावा, नाही पुढचा, ना मागचा, ना लाभार्थी.. पण मी आहे एक माणूस… संवेदनशील माणूस. राजकीय पक्ष, त्यांचे नेते, त्या सर्वच राजकीय पक्षांची विचारधारा, मिडिया, समाजमाध्यमं या कोणत्याही घटकांच्या अधीन होवून अंधपणे व्यक्त होत नाही. या देशातील एक सजग नागरिक आणि माणूसकी असलेला माणूस म्हणूनच व्यक्त होत आहे.
काही वर्षापूर्वी निर्भयाच्या बाबतीत अतिशय निंदनीय आणि अमानवी अशी घटना घडली. देश हादरला. दिल्ली हादरली. कँन्डलमार्च निघाले. मिडियाने नेहमीप्रमाणे आपला “बेंबीच्या देठापासून पुछता है भारतचा” नारा लावून धरला.काही वर्षे न्यायालयीन खटला चालला.ही प्रक्रिया सुरु असताना ज्या मातापित्यानी आणि कुटुंबियांनी आपल्या निर्भयाला गमावलं..त्यांना या प्रक्रियेला सामोर जाताना ज्या नरकयातनाना सामोरं जावं लागलं. ते मुलीच्या दुःखापेक्षाही भयानक असतं. आपली कायद्याची प्रक्रिया एवढी क्लीष्ट आहे कि ती दिर्घ काळ चालत असल्याने आरोपींनाही पळवाटा शोधण्याची संधी मिळते…
निर्भया प्रकरण घडलं..निदान या आमच्या निष्पाप मुलीच्या अशा बलिदानामुळे हे शेवटचचं ठरो.अशी अपेक्षा आणि भावना व्यक्त करत असतानाही आपल्या देशात सतत अशा निर्भया नराधमांच्या वासनेला बळी पडत आहेत…पुन्हा तेच..मिडिया, राजकीय पक्षांच गलीच्छ राजकारण, आरोप- प्रत्योरोप…आणि पुन्हा परत निर्भया…
हाथरसची घटना ही तर क्रौर्याची परिसिमा गाठणारी घटना… त्याहीपेक्षा त्या घटनेनंतर जे अतिशय किळसवाणं राजकारण होत आहे त्याचा निषेध करायला शब्द अपुरे आहेत.जी आमची निष्पाप मुलगी या नराधमांच्या वासनेला आणि अत्याचाराला बळी पडली ती कोणत्या जातीची आहे यापेक्षा एका भारतीय नारीचा ज्या अमानुषपणे शारीरिक छळ करुन अतिशय क्रुरतेने तिचा बळी घेतला यासाठी त्या नराधमांना अद्दल घडवण्यासाठी राजकीय पक्षानी आणि नेत्यांनी पावलं उचलली पाहिजेत. ते राहिलं बाजूला घटना कोणती,घडलय काय? याचा तसुभरही विचार न करता प्रत्येकाने आपापला संकुचित राजकीय अजेंडा राबावायला सुरुवात केली.
आपले राजकीय पक्ष आणि त्या़चे नेते अशावेळी किती बेजबाबदारपणे वागतात याचं दर्शन आपल्याला नेहमीच होत.उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता.. त्यामुळे विरोधी पक्षांनी या विषयात राजकारण करणं अपेक्षित आहे.त्यामुळे उत्तर प्रदेशातील या घटनेवरून विरोधी पक्ष आक्रमक झाले…तेव्हा भाजपवाले काँग्रेसवाल्यानां जाब विचारतात.”तुमच्या राजस्थान मध्ये ज्या अशा घटना घडल्या त्याबाबत तुम्ही मौन का पाळलतं”? राजकीय युक्तिवाद करून एकामेकावर.नेहमीप्रमाणे चिखलफेक केली म्हणजे मुळ प्रश्नापासून फारकत घेता येते.हे तंत्र या राजकीय मंडळीना फारचं अवगत आहे.त्यातून भले काही काळ राजकीय लाभ होत असेल पण सामाजिक प्रश्न यामुळे दिवसेंदिवस अधिक जटिल होतात आणि या मंडळींना हेच अपेक्षित असतं..तापलेल्या तव्यावर राजकीय भाकऱ्या भाजून घेता येतात.
हाथरसच्या घटनेमुळे पुन्हा एका निष्पाप निर्भयाचा बळी गेला..राजकारण तापलं.विषयांच गांभीर्य लक्षात घेऊन मा.योगीनी सि.बि.आय मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली.खरतरं हे नेहमीप्रमाणे उशीरा सुचलेल शहाणपण..कदाचित दुसरा कोणताचं पर्याय नव्हता.तरीही तटस्थपणे विचार केल्यास एक सामान्य नागरिक म्हणून काही प्रश्न अनुत्तरित रहातात.
१)संपूर्ण घटनेत उ.प्रदेश पोलीस प्रशाशनाची भूमिका ही फारचं संशयास्पद असून त्यांच्या या अशा वागणूकीमुळेच योगी सरकारला विरोधकाना घेरण्याची आयतीच संधी मिळाली.
२) पोलीस प्रशाशनाने पिडीतेच्या कुटुंबियांना दिलेली वागणूक ही निषेधार्ह आहेच पण सरकारला बदनाम करणारी आहे.त्याची खात्री झाल्यावरच तातडीने पाच पोलीस अधिकाऱ्याना निलंबित करण्यात आले.
३) पोलीस ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत होते याचा अर्थ त्यांना वरिष्ठ स्तरावरून तसे आदैश असणार यात शंकाच नाही.
४) कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन पिडितेच्या कुटुंबियांच्या ताब्यात तिचा म्रुत देह अंत्यविधीसाठी देणे हा नैसर्गिक हक्क डावलून परस्पर त्याची वाट लावण्याचे कारण.काय?
थोडक्यात अशा निर्भया यापुढेही बळी पडत रहातील.मिडिया हा विषय आपापाली व्यवसायिक बांधीलकी सांभाळून मांडणी करतील…आणि या देशातील यच्चयावत सगळे राजकीय पक्ष याचं राजकारण करत रहातील..यापेक्षा कोणतीही अपेक्षा करण्यात अर्थ नाही..
— म्हणून म्हणावं लागत,
… जमलचं तर निर्भया आम्हांला माफ कर—
— अँड.नकुल पार्सेकर..

