You are currently viewing उन्हाळा आणि घ्यायची खबरदारी व ग्लोबल वॉर्मिंग…

उन्हाळा आणि घ्यायची खबरदारी व ग्लोबल वॉर्मिंग…

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा अप्रतिम लेख

सरते गुलाबी थंडी
आग ओकतो रवी
पुन्हा पुन्हा वाटते
अजुनी थंडी हवी

अशीच काहीशी परिस्थिती होते जेव्हा रंगेल, मऊशार, गुलाबी थंडी निरोप घेते….आणि कडाक्याची थंडी संपताना सुरुवातीस उबदार हवाहवासा वाटणारा उन्हाळा सुरू होतो. वसंत ऋतूच्या नंतर आणि शिशिर ऋतूच्या मधील काळ म्हणजे उन्हाळा. थंडीच्या दिवसात पहाटे गाढ झोपण्याची लागलेली सवय उन्हाळा सुरू होताच कमी होते…नको नको म्हटलं तरी पहाटेच उजाडतं आणि सकाळी लवकरच दिवस सुरु होतो…घामाच्या धारांचे लोट अंगावरून हळुवार निसटत धरणीवर विराजमान होतात आणि आता संपेल म्हणता म्हणता संध्याकाळी उशिरापर्यंत दिवस संपत नाही….दिवस मोठा आणि रात्र छोटी असा हा उन्हाळ्याचा कालावधी…घोटभर पाणी पिलं तरी अंगातून घामाच्या धारा वाहणारा…कडक उन्हात अंगाची लाही लाही करणारा…घशाला कोरड पाडणारा…कितीही पाणी पिलं तरी…अजून थोडं म्हणत शरीरास थंडावा देणारा हा काळ म्हणजे उन्हाळा…!
उन्हाळा जरी उष्णतेमुळे नकोसा वाटला तरी उन्हाळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे…. पोटभर खायला मिळणारी आपल्या आवडीची फळे…आंबा, करवंद, जांभूळ, चिकू, कलिंगड, पेरू, काजू, पपई, ही तर आपली वाट पाहत असतात…बाजारपेठेमध्ये सुटणारा आंब्याचा घमघमाट तनमन प्रसन्न करतो..अंगणी, बागेत फुलणारी विविधरंगी फुले…नयनसुख देतात…भर उन्हातून अंगाची काहीली होऊन आल्यावर अंगाला गारवा देणारी…सावलीत मायेने विसाव्याला घेणारी परसात वसंतात पालवी फुटून नटलेली.. पसरलेली झाडे…उन्हाळ्यात हवीहवीशी वाटतात…तप्त उन्हात सावली आणि गार वारा याचं महत्त्व तीच दाखवून देतात..
मोठमोठ्या शहरात वाढलेली सिमेंट काँक्रीटची जंगले…त्यावर सुखवस्तू इमारतीची निशाणी म्हणून सूर्यकिरणे परावर्तीत होण्यासाठी लावण्यात येणारी काचेची तावदाने…शहारांवरील इमारतींवर वाढलेली पत्र्यांची छप्परे…शहरीकरण विकासासाच्या नावावर गावोगावी… शहरांमध्ये विणलेली डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची जाळी…शहरांमध्ये वाढत्या लोकवस्ती मुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून काँक्रीटच्या टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत, त्यामुळे शहरांमध्ये अल्प प्रमाणात असलेले वृक्ष देखील नामशेष होत आहे, राखीव वन पट्ट्यांमध्ये देखील बेकायदेशीर रित्या लोकांची झालेली घुसखोरी, जंगलतोड…इमारतींच्या विकासासाठी काढलेली माती, इमारत बांधकामातील निरुपयोगी गाळ, कचरा आदी टाकून बुजविण्यात आलेली नदीपात्र, मोठमोठ्या प्रकल्पातील निरुपयोगी कचरा, माती आदी टाकून बुजवलेले समुद्र किनारे….इमारतींमध्ये सांडपाणी निचरा करण्यासाठी मारण्यात येणाऱ्या टाक्या आदींमुळे इमारतींच्या आवारातील विहिरींचे पाणी पिण्यायोग्य राहत नाही, आणि परिणामी नैसर्गिक असंतुलन होऊन जगभर ग्लोबल वार्मिंगचा धोका उद्भवला आहे.
एका बाजूने विचार केला असता अनेकांना ग्लोबल वॉर्मिंग या विषयाशी देणेघेणे सुद्धा नाही, काहींना तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय हे देखील माहिती नाही. त्यामुळे अनेकजण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ…आजकाल अनेकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनला तो ग्लोबल वॉर्मिंग. हवेतील पाण्याची वाफ, कार्बनडाय ऑक्साईड, मिथेन आदी वायूंमुळे पृथ्वीच्या भूपृष्ठाचे, वातावरणाचे तापमान वाढते. पृथ्वीवर पडणारी सूर्यकिरणे हे वायू शोषून घेतात, त्यामुळे पृथ्वीवरील तापमान वाढते. त्यामुळेच आज पृथ्वीवरील तापमानात प्रचंड वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे शहरे, गावे यांमध्ये डोंगरावरील जंगलांची होणार वृक्षतोड, कोळशावर केली जाणारी वीज निर्मिती, डिझेल पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांचे वाढते प्रमाण आदींमुळे कार्बनडाय ऑक्साईड चे प्रमाण खूप वाढले आहे. कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेणारी झाडेच नाहीशी झाल्याने वातावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यामुळेच कोरोना सारख्या महामारीत प्रत्येक ठिकाणी ऑक्सिजन प्लांट सुरू करावे लागले, ऑक्सिजन साठी लोक वळवळत, तडफडत होते. झाडांचे महत्त्व न जाणल्याने मानवावर ही परिस्थिती ओढवली आहे. कृत्रिम ऑक्सिजन वर आज जगण्याची वेळ अनेकांवर आली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अनेक दुष्परिणाम दिसून येतात तरीही लोक त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून स्वतःचेच भविष्य अंधारमय करत आहेत.
प्रत्येक ऋतू हा निसर्गाची साखळी सुरू राहण्यासाठी अत्यावश्यक आहे. उन्हाळा असला तरच पीक पिकवता येईल…पाण्याचे बाष्पीभवन होऊन ढग निर्मिती होईल आणि पावसाळ्या सारखा अत्यानंद देणारा ऋतू येईल…जगण्यासाठी आवश्यक असणारे पाणी तेव्हाच आपल्याला उपलब्ध होईल..पावसाच्या आगमनाने पाण्याचा साठा होईल तेव्हाच तर थंडीची मजा अनुभवता येईल आणि हिवाळ्याचा…गुलाबी थंडीचा आनंद लुटता येईल… हिवाळ्यातील गारठ्यावर मायेचा उबदार स्पर्श देण्यासाठी…पुन्हा उन्हाळा हवाच…!परंतु मानवाच्या चुकीमुळे पृथ्वीवर उष्णता प्रचंड वाढली. पृथ्वीवरील वाढत्या उष्णतेमुळे अनेक रोगांचा सामना करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. उष्माघात, उष्णता विकार, तापसरीच्या साथी, अशक्तपणा, अस्वस्थता अशा अनेक व्याधी उत्पन्न होतात. उष्माघाताने अनेकांना जीवास मुकावे लागते. सर्वत्र धूळ आणि उष्ण हवा वाहते, त्यामुळे उन्हाळ्यापासून मानवाला बचाव करणे आवश्यक ठरते.
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी घामाच्या विसर्जनामुळे खूप कमी होते, घशाला कोरड पडते, मुतखडा, लघवीचे विकार आदी उत्पन्न होतात. अशावेळी उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे, लिंबू सरबत, आंब्याच्या कैरीचे पन्हे, कोकम सरबत, गोड ताक, शहाळ्याचे पाणी, जांभूळ सरबत, उसाचा रस, काजू फळांचे सरबत असे नैसर्गिक आणि आरोग्यदायी पेय पिणे आवश्यक असते. गावातील नदीत डुबकी मारून अंगातील उष्णता कमी करता येते. थंड पाण्याची आंघोळ फायदेशीर ठरते, त्यामुळे अंगावर पुरळ पुटकुळ्या, घामोळे वगैरे येत नाही. परंतु अलीकडे अंगाला थंडावा देण्यासाठी अनेकदा आईस्क्रीम, कोकाकोला, लिम्का, पेप्सी सारखी पेय पिण्याचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे उष्णतेवर उपाययोजना होण्यापेक्षा आरोग्यासाठी दुष्परिणाम त्यातून जास्त दिसून येतात. उन्हाळ्याचा दाह कमी करण्यासाठी अति प्रमाणात थंडपेय पिणे म्हणजे देखील भविष्यात…पावसाळी हंगामात सर्दी, कफ, ताप सारख्या आजारांना आमंत्रण असते. उन्हाळ्यात थंडपेय पिण्यामुळे सुकलेला शरीरातील, डोक्यातील कफ पावसाळ्यात पातळ होऊन सर्दी तापासारखे आजार बळावतात.
उन्हाळ्यातील उष्णतेपासून बचाव करण्यासाठी शहरातील नागरिकांनी कुटुंबासहित गावी किंवा थंड हवेच्या ठिकाणी जाऊन सुट्टीचा आनंद लुटणे, मौसमी फळे जसे की आंबा, करवंद, जांभूळ, पेरू आदींवर यथेच्छ ताव मारणे देखील फायदेशीर ठरते. नैसर्गिक जलस्रोतात पोहणे शरीरासाठी व्यायाम आणि उन्हाळ्यासाठी उपयुक्त आहे. उन्हापासून बचावासाठी डोक्यावर कापडी टोपी, तोंडावर रुमाल, मास्क बांधणे, कडक उन्हाच्यावेळी, दुपारी शक्यतो घरीच राहणे, अधूनमधून पाणी, रस आदी द्रव पदार्थ पिणे, सफेद हलक्या रंगाचे सैल सुती कपडे परिधान करणे, चहा, कॉफी पिण्यावर नियंत्रण ठेवणे, पचन होईल असा हलका आहार घेणे, काकडी, गाजर, कांदा आदींचा जेवणात समावेश करणे, फळांचा रस पिणे आदी खबरदारी घेऊन आपल्याला उन्हाळ्यापासून बचाव करता येईल.
शेवटी सर्वच ऋतू हे केवळ ऋतुचक्र चालण्यासाठी नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा भागविण्यासाठी देखील आवश्यक आहेत. त्यामुळे कुठल्याही ऋतूला नाव न ठेवता आपल्या सवयी, आवडी निवडींमध्ये बदल करून वातावरणाशी आपल्या शरीराला मिळतेजुळते करून जगण्यातच आनंद मिळेल…आणि निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाशी एकरूप होऊन जगता आलं तरंच जीवन सुखकर आनंदमयी होईल यात शंकाच नाही….
*संघर्षातून मिळालेल्या गोष्टी ह्या रुचकर, चविष्ट असतात….संघर्ष न करता मिळालेल्या बेचव….मीठ नसलेल्या जेवणासारख्या…अळणीच….!

(दीपि)
दीपक पटेकर, सावंतवाडी.
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा